पॉझिटिव्ह आला अन् रुग्णालयातून पळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:10 AM2021-03-26T04:10:22+5:302021-03-26T04:10:22+5:30
भिवापूर : प्रकृती बरी नसल्यामुळे डॉक्टरांनी त्याला कोविड तपासणी करण्याची सूचना केली. त्यानेही चाचणी करून घेतली. दरम्यान रिपोर्ट घेण्यासाठी ...
भिवापूर : प्रकृती बरी नसल्यामुळे डॉक्टरांनी त्याला कोविड तपासणी करण्याची सूचना केली. त्यानेही चाचणी करून घेतली. दरम्यान रिपोर्ट घेण्यासाठी ‘तो’ गुरुवारी रुग्णालयात आला. रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे समजताच त्याने पळ काढला. यंत्रणेने दिवसभर त्याचा शोध घेतला. मात्र कुठेच थांगपत्ता लागत नसल्यामुळे अखेरीस नगरपंचायत प्रशासनाने पोलिसात तक्रार नोंदविली. एकंदरीत या प्रकारामुळे प्रशासनही हतबल झाले असून संसर्ग वाढण्याची भीती आहे. मनोज राऊत (४०) रा. तास कॉलनी, भिवापूर असे या पॉझिटिव्ह रुग्णाचे नाव आहे. प्राप्त माहिती नुसार प्रकृती ठिक नसल्याने डॉक्टरांनी त्याला कोविड तपासणी करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार मनोजची बुधवारी स्थानिक ग्रामीण रुग्णालयात आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली होती. दरम्यान मनोज पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट गुरुवारी ग्रामीण रुग्णालय प्रशासनाला प्राप्त झाला. सदर रिपोर्ट घेण्याकरिता मनोज दुपारी १२ वाजताच्या सुमारास ग्रामीण रुग्णालयात आला. दरम्यान त्याचा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे कळताच ‘तो’ ग्रामीण रुग्णालयातून पळाला. नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी त्याचा दिवसभर शोध घेतला. मात्र त्याचा कुठेच पत्ता लागला नाही. अखेरीस मुख्याधिकारी सुवर्णा दखणे यांच्या सूचनेनुसार नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने मनोज विरुद्ध पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली. साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ व ५६ तथा भादंविच्या कलम १८८ अन्वये गुन्हा नोंदविण्यात यावा, असे या तक्रारीत नमूद आहे. वृत्त लिहिस्तोवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.