तो बचावला, उद्ध्वस्त होता होता ...!
By Admin | Published: March 10, 2017 02:41 AM2017-03-10T02:41:28+5:302017-03-10T02:41:28+5:30
यशोधरानगरात राहणारी, वडील नसलेली १६ वर्षीय मुलगी पोलीस ठाण्यात पोहचली.
बलात्काराचा आरोप :
पोलिसांनाही भरली होती धडकी
नरेश डोंगरे नागपूर
यशोधरानगरात राहणारी, वडील नसलेली १६ वर्षीय मुलगी पोलीस ठाण्यात पोहचली. नेहमी घरी येणाऱ्या आपल्या बापाच्या वयाच्या व्यक्तीने आपल्याला मारहाण करून, बलात्कार केल्याची तिची फिर्याद होती. ती ऐकून पोलीस हादरले. प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेत त्यांनी लगेच आरोपीची शोधाशोध सुरू केली. त्याची गचांडी पकडून त्याला ठाण्यात आणले. बदड बदड बदडले. अल्पवयीन मुलीला मारहाण, शिवीगाळ करून धमकी देणे, बलात्कार करणे असे गंभीर आरोप असल्यामुळे त्याच्यावर पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक करण्याची प्रक्रिया सुरू झाली.
तिकडे आरोप असलेली व्यक्ती आपण तिला हातही लावला नाही, असे रडून-ओरडून सांगत होती. आपण निर्दोष आहो, असे म्हणत त्याचा आक्रोश सुरू होता. ती आपल्या बहिणीसारखी, मुलीसारखी आहे, असेही म्हणत होता. प्रत्येक निर्ढावलेला आरोपी असेच म्हणतो. त्यामुळे त्याच्या म्हणण्याकडे लक्ष देण्याचा प्रश्नच नव्हता. इकडे त्याची धुलाई तर तिकडे तिची जबानी (तोंडी माहिती) घेणे सुरू होते.
घटना, तारीख, वेळ अशी सविस्तर माहिती विचारली जात होती. मुलीने ती सर्वच सांगितली. घटनेनंतर आपण इंदोरा ठाण्यात गेलो. तेथे आपली कैफियत सांगितली. त्यांनी याला पकडून आणले. त्याने गुन्ह्याची कबुलीही दिली. मात्र, नंतर एक जण आला अन् त्याने पोलिसांसोबत काहीतरी ‘व्यवहार’ केला. त्यामुळे याला सोडून देण्यात आले, असा गंभीर आरोपही मुलीने केला होता. त्यामुळे हे प्रकरण पोलिसांनी अधिकच गंभीरपणे घेतले. तिचे बयान झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला फैलावर घेतले. घटनेच्या वेळी तू कुठे होता, काय करीत होता, त्याबाबत विचारणा सुरू झाली. मुलीने अत्याचाराची जी वेळ सांगितली, त्यावेळी आपण बारमध्ये ‘ग्राहकांच्या सेवेत’ होतो. पाहिजे तर बारमालक, वेटर अन् ग्राहकालाही विचारून घ्या, त्यांनी नाही म्हटले तर फासावर टांगा, अशी गयावया तो पोलिसांकडे करीत होता. गुन्हा दाखल करून त्याला कोठडीत टाकण्यापूर्वी त्याच्या कथनाची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी गड्डीगोदाममधील तो बार गाठला. मुलीने अत्याचाराची जी वेळ सांगितली, त्याच्या खूप तासाअगोदरपासून तीन तासानंतरपर्यंत तो बारमध्ये काम करीत असल्याचे बारमधील अनेकांचे सांगणे होते. सीसीटीव्ही फुटेजमधून ते खरे असल्याचे दिसत होते. त्यामुळे मुलगी खोटे बोलत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. महिला पोलिसांनी तिला पुन्हा विश्वासात घेऊन विचारणा सुरू केली. खोटे बोलल्यास काय परिणाम होऊ शकतो, त्याची कल्पनाही दिली. त्यानंतर ती गडबडली. तक्रार द्यायला घेऊन आलेल्या दोन मित्रांचीही वेगवेगळ्या प्रकारे झाडाझडती घेण्यात आली अन् भलताच धक्कादायक प्रकार पुढे आला.
त्याला वेळेने साथ दिली !
पोलिसांकडे फिर्याद सांगताना तिने दोन मोठ्या चुका केल्या. एक म्हणजे, आपण इंदोरा पोलीस ठाण्यात गेलो होतो, त्यांना घटना सांगताच पोलिसांनी लगेच त्याला ठाण्यात आणले होते, असे सांगितले. नागपुरात इंदोरा पोलीस ठाणेच नाही, त्यामुळे तिने स्वत:च बयानातून शंका उपस्थित केली.
दुसरे म्हणजे, तिने घटनेची जी वेळ सांगितली, ती तिच्या कारस्थानाला उघड करणारी ठरली. त्या वेळेला (आधीपासून अन् नंतरही) तो बारमध्ये काम करीत असल्याचे सीसीटीव्हीमधून स्पष्ट दिसत होते. त्यामुळे तिचा खोटेपणा पुढे आला. त्याबाबत सांगताना ती म्हणाली, कथित काका वेळीअवेळी घरी येत असल्यामुळे त्याच्याबद्दल तिच्या मनात घृणा होती. त्यामुळे त्याला धडा शिकवण्यासाठी रागाच्या भरात तिने अन् तिच्या मित्राने कुभांड रचल्याची पोलिसांपुढे कबुली दिली. त्यांचे वय, घरची स्थिती लक्षात घेता पोलिसांनी त्यांचे समुपदेशन करून सोडून दिले. त्याला (ज्याच्या विरोधात तक्रार होती) मात्र वेळेने साथ दिल्याने तो उद्ध्वस्त होता होता बचावला!