वेदनांतून सुटका करून घेण्यासाठी त्याने लावला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 12:12 AM2021-07-23T00:12:45+5:302021-07-23T00:13:16+5:30
Suicide कर्करोगाच्या असह्य वेदनातून सुटका करून घेण्यासाठी एका गरीब मजुराने गळफास लावून आत्महत्या केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - कर्करोगाच्या असह्य वेदनातून सुटका करून घेण्यासाठी एका गरीब मजुराने गळफास लावून आत्महत्या केली. देवानंद पुंडलिक झाडे (वय ४०) असे मृताचे नाव आहे. तो वाठोडा भागातील न्यू पँथर नगरात राहत होता. रोजमजुरी करून स्वत:चे पोट भरणारा देवानंद गेल्या काही वर्षांपासून कर्करोगाशी लढत होता. गरिबीमुळे चांगले उपचार आणि आहार घेणे शक्य नसल्याने त्याच्या वेदनात दिवसेंदिवस वाढ होत होती. त्यामुळे देवानंदची स्थिती फारच केविलवाणी झाली होती. जीवघेण्या वेदनातून सुटका करून घेण्यासाठी त्याने गळफास लावून घेतला. बुधवारी सकाळी ९ च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. पुंडलिक नारायण झाडे (वय ६५) यांनी दिलेल्या तक्रारीवरून नंदनवनच्या एएसआय सविता यादव यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
उत्तर प्रदेशातील तरुणाची आत्महत्या
मूळचा उत्तर प्रदेशमधील रहिवासी असलेल्या एका तरुणाने गळफास लावून बुधवारी सकाळी आत्महत्या केली.
कुलदीपसिंग ओमप्रकाशसिंग (रा. ३०, अलीगड) असे त्याचे नाव आहे. तो गेल्या १२ वर्षांपासून शताब्दी चाैकातील एका टाईल्सच्या दुकानात काम करायचा. दुकानातच झोपायचा. अजनी पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
दुकानातून परतला अन् गळफास लावला
अजनीतील एका छोट्या व्यापाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली. बुधवारी सायंकाळी ही घटना घडली. अतुल सुरेश शाहू (वय ३७) असे मृताचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अजनीच्या द्वारकापुरीत राहणारा अतुल मनीषनगरात एक दुकान चालवायचा. नेहमीप्रमाणे तो बुधवारी सायंकाळी दुकानातून घरी परतला. काही वेळेनंतर पत्नी त्याच्या रूममध्ये गेली असता आतमधून दार लावून असल्याचे तिला जाणवले. वारंवार आवाज देऊनही प्रतिसाद मिळत नसल्याने पत्नीने बाजूच्या खिडकीतून बघितले असता अतुल गळफास लावून दिसला. त्यामुळे तिने आरडाओरड केली. घरच्यांनी शेजाऱ्याच्या मदतीने दार तोडून अतुलला खाली उतरवले. त्याला मेडिकलमध्ये नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सुरेश गुलाबचंद शाहू (वय ६४) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.