न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर स्वत: ईडीसमोर जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:12 AM2021-08-20T04:12:08+5:302021-08-20T04:12:08+5:30
नागपूर : आपली ईडीच्या बाबतीतील याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली आहे. सर्वोच्च न्यायालय लवकरच ही याचिका ऐकून घेणार आहे. त्याचबरोबर ...
नागपूर : आपली ईडीच्या बाबतीतील याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली आहे. सर्वोच्च न्यायालय लवकरच ही याचिका ऐकून घेणार आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला खालच्या न्यायालयामध्ये जाण्यास मुभा दिली आहे. त्यामुळे आता ही न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मी स्वत: ईडीच्या समोर जाणार आहे व त्यांना संपूर्ण सहकार्य करणार आहे, असे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरुवारी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
अनिल देशमुख यांच्याशी संबंधित प्रकरणात सीबीआयच्या एफआयआरमधील अधिकाऱ्यांच्या बदल्या व पुनर्नियुक्तीबाबतचे दोन परिच्छेद वगळावे, अशी महाराष्ट्र सरकारने दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टाने बुधवारी फेटाळली. सीबीआयला सर्व पैलू विचारात घेऊन तपासाचा अधिकार आहे. त्यांना मर्यादा घालणार नाही, असेही कोर्टाने सांगितले. तर दुसरीकडे भ्रष्टाचारप्रकरणी दाखल गुन्ह्याची सीबीआयकडून होत असलेली चौकशी रद्द करण्यास मुंबई हायकोर्टाने दिलेल्या नकाराला आव्हान देणारी देशमुख यांची याचिकाही सुप्रीम कोर्टाने फेटाळली होती.
या पार्श्वभूमीवर देशमुख यांनी गुरुवारी प्रसिद्धी पत्रक जारी करीत प्रतिक्रिया दिली. सर्वोच्च न्यायालयाने मला खालच्या न्यायालयामध्ये जाण्यास मुभा दिली असल्याचे सांगत, आपल्याकडे न्यायालयीन पर्याय उपलब्ध असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. माझ्या संपूर्ण राजकीय, सामाजिक जीवनात मी सदैव उच्च आदर्शाचे पालन केले आहे, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.