घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांना देणार जंतनाशक गोळ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:13 AM2021-09-16T04:13:36+5:302021-09-16T04:13:36+5:30
टास्क फोर्सची बैठक : २१ ते २८ सप्टेंबरदरम्यान जंतनाशक सप्ताह लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मातीच्या संपर्कात आल्यामुळे ...
टास्क फोर्सची बैठक : २१ ते २८ सप्टेंबरदरम्यान जंतनाशक सप्ताह
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मातीच्या संपर्कात आल्यामुळे अस्वच्छ हाताच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या पोटात जंत जाण्याची शक्यता आहे. सध्या शाळा बंद असल्याने आशा वर्कर घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करणार आहेत.
२१ ते २८ सप्टेंबरदरम्यान जंतनाशक सप्ताहात विद्यार्थ्यांनी जंतनाशक गोळी घ्यावी यासाठी महापालिका जनजागृती करणार आहे. बुधवारी मनपा मुख्यालयात झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत याबाबत माहिती देण्यात आली. अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्यासह अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, डॉ. विजय जोशी, जागतिक आरोग्य संघटनेचे सर्वेक्षण अधिकारी डॉ. साजीद खान, शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर, नोडल अधिकारी डॉ. मंजू वैद्य, कोविड लसीकरणचे नोडल अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे यांच्यासह झोनल आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
मंजू वैद्य यांनी राष्ट्रीय जंतनाशक दिन, मॉप-अप दिन आणि जंतनाशक सप्ताहामध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली. ६ ते १९ वर्षे वयोगटातील बालकांसाठी व किशोरवयीन मुलामुलींसाठी तसेच १ ते १९ वर्षे वयोगटातील अंगणवाडी व शाळेत न जाणाऱ्या बालकांसाठी व किशोरवयीन मुला-मुलींसाठी हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. ऑनलाइन शिक्षण सुरू असल्याने शिक्षकांच्या माध्यमातून ऑनलाइन क्लासमध्ये विद्यार्थ्यांनी जंतनाशक गोळ्या घेतल्या अथवा नाही, याबाबत विचारणा करावी. सर्व लसीकरण केंद्रांवरही जंतनाशक गोळ्या देण्याची व्यवस्था करण्यात यावी, असे निर्देश राम जोशी यांनी दिले.
...
आजारी बालकांना गोळी नाही
जंतनाशक दिनी व मॉप-अप दिनी आजारी किंवा अन्य औषधे घेणाऱ्या बालकांना जंतनाशक गोळी दिली जाणार नाही. अशा बालकांना ही गोळी आजारातून बरे झाल्यावर दिली जाणार आहे.
..
काय करावे आणि काय करू नये?
औषधाची गोळी घशात अडकू नये, यासाठी बालकाला नेहमी गोळी चावून खाण्यास सांगावे. १ ते २ वर्षांमधील बालकांना गोळीची पावडर करून द्यावी, आजारी बालकाला कधीही ही गोळी देऊ नये. दुष्परिणाम उद्भवल्यास नजीकच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा.
..
जंतसंसर्ग थांबविण्यासाठी काय करावे?
जेवणापूर्वी व शौचालयाचा वापर केल्यावर हात स्वच्छ धुवावेत.
पायात चपला, बूट घालावेत.
निर्जंतुक व स्वच्छ पाणी प्यावे.
व्यवस्थित शिजविलेले अन्न खावे.
निर्जंतुक व स्वच्छ पाण्यात भाज्या व फळे धुवावीत.
नखे नियमित कापावीत व स्वच्छ ठेवावीत.
...