स्वतंत्र विदर्भ घेणारच
By admin | Published: May 9, 2016 03:08 AM2016-05-09T03:08:49+5:302016-05-09T03:08:49+5:30
विदर्भातील दारिद्र्य संपवून येथे संपन्नता आणावयाची असेल तर स्वतंत्र विदर्भ हाच एकमेव पर्याय आहे.
विदर्भ राज्य आंदोलन समिती : सरकारला ३१ डिसेंबरची डेडलाईन
नागपूर : विदर्भातील दारिद्र्य संपवून येथे संपन्नता आणावयाची असेल तर स्वतंत्र विदर्भ हाच एकमेव पर्याय आहे. यासाठी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता विदर्भाचा तीव्र लढा उभारून कोणत्याही परिस्थितीत स्वतंत्र विदर्भ मिळवू, असा निर्धार रविवारी विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे आमदार निवास येथे आयोजित विदर्भवादी युवकांच्या कार्यशाळेत करण्यात आला.
समितीचे नेते माजी आमदार वामनराव चटप यांच्या अध्यक्षतेखाली ही कार्यशाळा पार पडली. अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले, समितीचे मुख्य संयोजक राम नेवले, प्रबीरकुमार चक्रवर्ती अरविंद देशमुख,अरुण केदार, पुरुषोत्तम पाटील, हेमराज रहाटे, विनायक खोरगडे, डॉ. दीपक मुंढे, प्रदीप धामणकर, निखिल गवळी, अर्चना नंदगडे आदी उपस्थित होते.
गेली ५६ वर्षे महाराष्ट्रात राहूनही विदर्भ करारानुसार विदर्भाचा संतुलित विकास झालेला नाही. सन्मानाने व सुखाने जगण्यासारखी परिस्थिती विदर्भात राहिलेली नाही. येथील जनतेच्या वाट्याला दारिद्र्य, निराशा व आत्महत्या आल्या आहेत. बेरोजगारी, घटलेले दरडोई उत्पन्न, उद्योगांचा अभाव, लोकसंख्येच्या आधारावर हक्काचा न मिळालेला निधी, निर्माण झालेला सिंचनाचा अनुशेष, यामुळे विदर्भाची अधोगती होत आहे. विदर्भाला गतवैभव मिळवून देण्यासाठी स्वतंत्र विदर्भ हाच त्यावर रामबाण उपाय असल्याचे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते अँड. वामनराव चटप यांनी सांगितले.
विदर्भ सर्वदृष्टीने सक्षम आहे. त्यामुळे याचा आढावा घेण्याची गरज नाही. राज्यकर्त्यानी आजवर विदर्भाची उपेक्षाच केली आहे. विदर्भ वेगळा झाला तर सक्षम राज्य होणार नाही, अशी भीती राज्यकर्त्यांकडून दाखविली जाते. परंतु विदर्भ सर्वात मोठा प्रदेश असून संपन्न आहे. संविधानात स्वतंत्र राज्य निर्माण करण्याची तरतूद आहे. त्यामुळे आम्ही घटनेतील तरतुदीनुसारच स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी करीत असल्याचे श्रीनिवास खांदेवाले यांनी विदर्भ राज्य आर्थिक, सामाजिक व राजकीय चिंतन या विषयावर बोलताना सांगितले.
मराठी भाषिक राज्याचे दोन तुकडे होऊ देणार नाही, अशी भूमिका काही राजकीय नेत्यांकडून घेतली जात आहे. परंतु या संदर्भात केंद्र सरकारला निर्णय घ्यावयाचा आहे. स्वतंत्र विदर्भासाठी युवकांचा आवाज बुलंद करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले.
१ मे रोजी स्वतंत्र विदर्भाचे आंदोलन यशस्वी झाल्याने विदर्भवाद्यात उत्साहाचे वातावरण आहे. यात युवकांचा सहभाग वाढला पाहिजे. देश स्वतंत्र झाला तेव्हा ५० कोटी लोकांना पुरेल इतके धान्य नव्हते. आज १२५ कोटी लोकसंख्येला पुरून उरेल इतके अन्नधान्याचे उत्पादन आहे. परंतु शेतकरी आत्महत्या करीत आहे. विदर्भात सर्वाधिक ३६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. कर्जबाजारी राज्यात विदर्भाचा विकास शक्य नाही. राज्यक र्त्याचीही अशी मानसिकता नाही. सत्तेवर येण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विदर्भाचा मुख्यमंत्री व्हायला आवडेल असे म्हणत होते. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी विदर्भाचे लेखी आश्वासन दिले होेते. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही, असे म्हणतात. यामुळे विदर्भाच्या मुद्यावर संभ्रम निर्माण क रीत असल्याचा आरोप राम नेवले यांनी केला.
अरविंद देशमुख यांनी विदर्भ वेगळा झाला तर सक्षम राज्य होईल, असा विश्वास व्यक्त केला. अर्चना नंदगडे यांनी आंदोलनात महिलांचा सहभाग वाढविण्याची मागणी केली. विदर्भातील सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)
१ जानेवारीनंतर तीव्र आंदोलन
३१ डिसेंबरपर्यंत केंद्र सरकारने स्वतंत्र विदर्भासंदर्भात निर्णय न घेतल्यास १ जानेवारी २०१७ पासून समितीतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा वामनराव चटप यांनी दिला.
युवा आघाडीची कार्यकारिणी जाहीर
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या युवा आघाडीची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात पूर्व विदर्भ प्रमुख म्हणून डॉ. दीपक मुंढे तर पश्चिम विदर्भाची जबाबदारी प्रदीप धामणकर यांच्यावर सोपविण्यात आली.