खाकी वर्दीवरच वडाच्या झाडाला घातले फेरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 11:04 PM2020-06-05T23:04:54+5:302020-06-05T23:08:10+5:30
पुरुष सहकाऱ्याच्या खांद्याला खांदा लावून दिवसरात्र रस्त्यावर कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी ही परीक्षेची वेळ आहे. पण कर्तव्य बजावताना कुटुंबाची जबाबदारीही त्या खंबीरपणे पार पाडत आहेत. हेच दृश्य शुक्रवारी वटपौर्णिमेच्या उत्सवात दिसले. छान साडी घालून सजण्याची उसंत मिळाली नाही, मग कर्तव्याची वेळ आणि स्थितीची सांगड घालून या महिला पोलिसांनी वर्दीवरच वडाची पूजा करीत परंपरेचीही जबाबदारी पूर्ण केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वटपौर्णिमेचा सण हा भारतीय स्त्रीसाठी अत्यंत महत्त्वाचा. वडाच्या झाडाला सूत बांधत फेऱ्या मारताना आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभो ही त्या परंपरेमागे असलेली महिलेची भावना. महिलांचा सण म्हटले की थोडे सजूनसवरून तो साजरा करण्याची इच्छा तर होईलच. मात्र पुरुष सहकाऱ्याच्या खांद्याला खांदा लावून दिवसरात्र रस्त्यावर कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी ही परीक्षेची वेळ आहे. पण कर्तव्य बजावताना कुटुंबाची जबाबदारीही त्या खंबीरपणे पार पाडत आहेत. हेच दृश्य शुक्रवारी वटपौर्णिमेच्या उत्सवात दिसले. छान साडी घालून सजण्याची उसंत मिळाली नाही, मग कर्तव्याची वेळ आणि स्थितीची सांगड घालून या महिला पोलिसांनी वर्दीवरच वडाची पूजा करीत परंपरेचीही जबाबदारी पूर्ण केली.
कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढतच आहे. अशात प्रत्येकाचा संयमाचा बांध तुटतो आहे. मात्र डॉक्टरांसोबत दिवसरात्र रस्त्यावर कर्तव्य बजावणारे खाकी वर्दीतील योद्धा आपली जबाबदारी नेटाने पार पाडत आहेत. कर्तव्यावर कधीही निघावे लागते. पोलीस कर्मचाऱ्यांच्या कामाच्या ठराविक वेळा नाहीत. अशाही स्थितीत महिला पोलीस कर्मचारी कर्तव्य आणि कुटुंब या दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. पुरुषांप्रमाणे २४ तास कर्तव्यावर तैनात आहेत. कोरोना संसर्गाच्या काळात नागरिकांच्या सुरक्षेकरिता कर्तव्य बजावणे महत्त्वाचे आहे. साहजिकच कर्तव्य बजावताना कुटुंबालाही सांभाळण्याची यशस्वी धडपड त्या करीत आहेत. शुक्रवारी वटपौर्णिमेचा सण आला तेव्हाही त्यांची भावनिक आस्था दिसली. वटपौर्णिमेच्या दिवशी साधारणत: महिला साजशृंगार करून वडाची पूजा करतात. मात्र कर्तव्यवर तैनात महिला पोलीस कर्मचाऱ्यांनीही यातूनही मार्ग काढला. पर्यावरणदिन आणि वटपौर्णिमा एकाच दिवशी आल्याने आज झाडांची पूजा व्हावी असे या पोलीस कर्मचाऱ्यांच्या मनात आले. कर्तव्य महत्त्वाचे असल्याने वेळ नव्हताच. मग वर्दीवरच वटपौर्णिमा साजरी करण्याचा निर्णय या पोलीस कर्मचाऱ्यांनी घेतला. वर्दीवर झालेली त्यांची पूजा कुतूहलाचा विषय ठरली पण तेवढीच अभिमान वाटावे असेच हे दृश्य होते. संकट मोठे आहे पण आमच्या परंपरा आणि भावनिक मजबुती तोडू शकत नाही हेच यातून या कोरोना वॉरियर्सनी दाखविले.