नागपुरात एसीबीने बांधले हवालदाराचे हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 08:42 PM2019-01-29T20:42:32+5:302019-01-29T23:52:11+5:30

गुन्ह्यातील एक कलम कमी करून आरोपींना अटक न करण्यासाठी २० हजारांची लाच मागणाऱ्या पोलीस हवालदाराला येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने जेरबंद केले. संजय चिंतामणराव गायधने असे आरोपीचे नाव असून तो हुडकेश्वर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.

The Head constable's hand tight by ACB in Nagpur | नागपुरात एसीबीने बांधले हवालदाराचे हात

नागपुरात एसीबीने बांधले हवालदाराचे हात

Next
ठळक मुद्दे२० हजारांच्या लाचेची मागणी : हुडकेश्वर पोलीस ठाण्यात खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुन्ह्यातील एक कलम कमी करून आरोपींना अटक न करण्यासाठी २० हजारांची लाच मागणाऱ्या पोलीस हवालदाराला येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने जेरबंद केले. संजय चिंतामणराव गायधने असे आरोपीचे नाव असून तो हुडकेश्वर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.
तक्रारदार हे बल्लारपूर (जि. चंद्रपूर) जवळच्या ब्राम्हणी येथील गुरुनानक कॉलेजजवळ राहतात. ते लेबर कॉन्ट्रॅक्टर आहेत. हुडकेश्वर परिसरात त्यांच्या वाहनाने झालेल्या अपघात प्रकरणात त्यांच्यासह त्यांच्या आतेभावा (वाहनचालका) विरुद्ध हुडकेश्वर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक १७/ १९ कलम २७९, ३३७, ३३८, ४२७, १३४, १७७ मोटर वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास हवालदार संजय गायधने यांच्याकडे होते. या गुन्ह्यात त्यांना तसेच त्यांच्या आतेभावाला अटक न करता गुन्ह्यातील एक कलम कमी करण्यासाठी गायधनेने तक्रारदाराला २० हजारांची लाच मागितली होती. लाचेची रक्कम मिळाल्यास ठाण्यातूनच जामीन देऊ, असेही म्हटले होते. लाचेची रक्कम द्यायची नसल्याने तक्रारदाराने येथील एसीबीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून तक्रार नोंदवली. त्यावरून एसीबी अधिकाऱ्यांनी तक्रारीची शहानिशा करून सापळा रचला. आज पहाटे लाचेची रक्कम घेऊन गायधनेने तक्रारदाराला पोलीस ठाण्याजवळ बोलविले. तक्रारदार आणि त्यांचा आतेभाऊ मंगळवारी सकाळी ९ वाजता पोलीस ठाण्यात पोहचले असता गायधने त्यांना घेऊन बाजूच्या सांस्कृतिक भवनाजवळच्या चौकात गेला. तेथे त्याने लाचेची रक्कम स्वीकारताच बाजूलाच घुटमळणाºया एसीबीच्या पथकाने गायधनेला पकडले. त्याच्याकडून लाचेची रक्कम जप्त केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
एसीबीचे प्रभारी उपायुक्त श्रीकांत धिवरे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजेश दुद्धलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक फाल्गुन घोडमारे, नायक रविकांत डहाट, मनोज कारणकर, मंगेश कळंबे, सहायक फौजदार परसराम शाही आदींनी ही कामगिरी बजावली.
त्याला दिले माझे काय?
कार अपघातात दुचाकीचालकाला किरकोळ दुखापत झाली होती आणि दुचाकीचेही नुकसान झाले होते. अपघाताच्या वेळी तक्रारकर्ते (कारमालक) बाजूला बसून होते. तर, कार त्यांचा आतेभाऊ चालवत होता. अपघातानंतर तक्रारकर्त्याने जखमीच्या उपचाराचा खर्च करून त्याच्या दुचाकीचेही नुकसान भरून देणार असे सांगितले होते. त्यामुळे त्यांच्यात समेट झाला होता. तरीसुद्धा हवालदार गायधने या प्रकरणाला गंभीर गुन्ह्याचे स्वरूप असल्याची बतावणी करून तक्रारदाराला त्रास देत होता. आमच्यात समेट झाला मी त्याचे (जखमीचे) नुकसान भरून दिले, असे तक्रारकर्त्याने गायधनेला सांगितले होते. त्यावर गायधनेने ‘त्याला दिले, माझे काय’, असे म्हणत २० हजारांसाठी तक्रारदाराला त्रास देणे सुरू केले होते. तक्रारकर्त्यांनी गायधनेला पाच हजार रुपये देण्याची तयारी दाखवली असता, भीक देतो का, असे म्हणत त्यांना शिवीगाळ केली होती. त्याचमुळे कंटाळलेल्या तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतली अन् अखेर गायधनेला एसीबीच्या सापळ्यात अडकवले.

Web Title: The Head constable's hand tight by ACB in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.