व्याघ्रहल्ल्यापासून वाचण्यासाठी डोक्यामागे लावा वाघाचे मुखवटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 11:31 PM2019-09-17T23:31:49+5:302019-09-17T23:32:50+5:30
शेतावर काम करताना किंवा जनावरे चारताना डोक्यामागे वाघाचे मुखवटे लावून काम करण्याचा सल्ला वनविभागाकडून दिला जात आहे. सुंदरबन जंगलात हा प्रयोग यशस्वी झाल्याचे सांगितले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या आठवडाभरापासून काटोल रोडवरील फेटरी, बोरगाव, येरला, खडगाव, भरतवाडा, माहुरझरी, चिंचोली, दहेगाव, खंडाळा गावांच्या परिसरात वाघ फिरत असल्याच्या चर्चेने दहशत पसरली आहे. गावकरी शेतातवर जायला घाबरत आहे. या परिस्थितीत शेतावर काम करताना किंवा जनावरे चारताना डोक्यामागे वाघाचे मुखवटे लावून काम करण्याचा सल्ला वनविभागाकडून दिला जात आहे. सुंदरबन जंगलात हा प्रयोग यशस्वी झाल्याचे सांगितले जात आहे.
माहितगार सूत्रांच्या मते साधारणत: वाघ निर्जन ठिकाणी माणसावर पाठीमागून हल्ला करतो. शेतात वाकून काम केले जाते. या वाकलेल्या माणसांना पाहून कुणी लहान वन्यजीव असल्याचा भास वाघाला होतो. अशा परिस्थितीतही वाघ पाठीमागूनच हल्ला करतो. त्यामुळे नागरिकांच्या जागृतीसाठी वनविभागाने गावांमध्ये बॅनर लावून संदेश पोहचविणे सुरू केले आहे. वाघाच्या संभाव्य हल्ल्यापासून वाचण्यासाठी शेतात काम करताना दक्षता बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यासाठी बॅनर आणि होर्र्डींगच्या माध्यमातून गावकऱ्यांना जागृत केले जात आहे.
जंगलात एकटे जाण्याऐवजी दोन-तीन जणांच्या गटाने जावे, शेतात काम करताना किंवा तेंदूपत्ता तोडाईसाठी आणि मोहाफुले वेचण्यासाठी झुंडीने जावे, मोठ्या आवाजात बोलावे असा सल्ला दिला आहे.
रविवार सकाळी बोरगावमध्ये शिकारीजवळ लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये वाघ असल्याचे आढळले. हा वाघ कळमेश्वरच्या निमजीमधून भटकून या गावांकडे आला असल्याची शक्यता वनअधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.