अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी वाढली विद्यार्थ्यांची डोकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 10:40 PM2019-06-18T22:40:15+5:302019-06-18T22:42:04+5:30
अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. तंत्रशिक्षण विभागाकडून ही प्रक्रिया काढून आता सीईटी सेल राबवितो आहे. सीईटी सेलने यासाठी कल्प टेक्नॉलॉजिकल प्रा. लि. पुणे या कंपनीला काम दिले आहे. कंपनीने प्रवेशासाठी तयार केलेल्या सॉफ्टवेअरमध्ये इतक्या गुंतागुंतीच्या बाबी आहे की विद्यार्थी पुरते गोंधळलेले आहे. सोबतच नेटवर्क मिळत नसल्याने वारंवार सॉफ्टवेअरमध्ये अडचणी येत आहे. त्यामुळे प्रवेशासाठी आवश्यक ते दस्तावेज अपलोड करूनही ते सबमिट होत नसल्याची विद्यार्थी व पालकांकडून ओरड सुरू झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. तंत्रशिक्षण विभागाकडून ही प्रक्रिया काढून आता सीईटी सेल राबवितो आहे. सीईटी सेलने यासाठी कल्प टेक्नॉलॉजिकल प्रा. लि. पुणे या कंपनीला काम दिले आहे. कंपनीने प्रवेशासाठी तयार केलेल्या सॉफ्टवेअरमध्ये इतक्या गुंतागुंतीच्या बाबी आहे की विद्यार्थी पुरते गोंधळलेले आहे. सोबतच नेटवर्क मिळत नसल्याने वारंवार सॉफ्टवेअरमध्ये अडचणी येत आहे. त्यामुळे प्रवेशासाठी आवश्यक ते दस्तावेज अपलोड करूनही ते सबमिट होत नसल्याची विद्यार्थी व पालकांकडून ओरड सुरू झाली आहे.
कल्प टेक्नॉलॉजिकल प्रा. लि. या कंपनीने या प्रक्रियेसाठी सेतू सविधा केंद्र तयार केले आहे. या सेतू सुविधा केंद्रामध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलेले नाही. या केंद्रामध्ये विद्यार्थ्यांनी अपलोड केलेल्या दस्तावेजाची तपासणी करण्यात येत आहे. पण लिंकच मिळत नसल्याने सेतू केंद्राचे काम सुद्धा ठप्प पडले आहे. यापूर्वी डीटीईतर्फे ही प्रवेश प्रक्रिया राबवित असताना सीईटीचा रोल नंबर आणि जन्मतारीख टाकली की विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती यायची. आता विद्यार्थ्यांना सीईटीचा निकाल, अप्लिकेशन फॉर्म आणि हॉल तिकीट सुद्धा अपलोड करायचे आहे. त्यानंतर कॅटॅगिरी सिलेक्ट केल्यावर अनावश्यक २५ ते ३० प्रकारच्या डॉक्युमेंटची मागणी करण्यात येत असल्याने पुन्हा विद्यार्थ्यांचा गोधळ उडतो आहे. विशेष म्हणजे २१ जूनपर्यंत ही सर्व प्रक्रिया पार पाडायची आहे. पण तांत्रिक अडचणी वाढल्याने एकाही विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पडलेली नाही. आज दुपारपासून सीईटी सेलने सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड असल्याने व्हेरीफिकेशन प्रक्रिया पूर्ण करता येणार नाही, असे नमूद केले आहे.
विशेष म्हणजे सीईटी सेलने प्रवेश प्रक्रियेसंदर्भात विद्यार्थ्यांना माहीत होईल, यासंदर्भात कुठलीही प्रक्रिया राबविली नाही. कुठलेही नोटिफिकेशन, कुठलेही मार्गदर्शन, कुठलीही जाहिरात प्रसिद्ध केली नाही. त्यामुळे विद्यार्थी तोंडातोडीं मिळालेल्या माहितीनुसार प्रक्रिया करीत आहे.
तांत्रिक अडचणीमुळे विद्यार्थी त्रस्त
त्याचबरोबर डॉक्युमेंट अपलोड करताना फाईलचे साईजमध्ये रिस्ट्रीक्शन ठेवले आहे. त्यातही सीईटीचा चार पानाचा अप्लिकेशन फॉर्म लोड करताना त्याचा साईज २५० केबीचा होत आहे. ही सर्व प्रक्रिया केल्यानंतर सेतू सविधा केंद्रात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी गेल्यानंतर आणखी वेगवेगळ्या डॉक्युमेंटची मागणी करण्यात येत आहे. त्यातही व्हेरिफिकेशनसाठी सर्व्हरचा प्रॉब्लेम असल्याने लिंक मिळत नाही. सेतू सुविधा केंद्रातून कुठलेही मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळत नाही.
सेतू केंद्रासाठी दिलेले हेल्पलाईन नंबर बंद
प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सेतू सविधा केंद्रासाठी सीईटी सेलने ८६५७५२४६७३ व ८६५७५२४६७४ हे दोन हेल्पलाईन क्रमांक दिले आहे. परंतु दोन्ही हेल्पलाईन क्रमांक डायल केले असता, ते बंद दाखवीत आहे.