अतिक्रमण हटविल्यावरही महामार्ग-६९ वरील डोकेदुखी कायमच ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:11 AM2021-02-18T04:11:53+5:302021-02-18T04:11:53+5:30
वसीम कुरेशी नागपूर : वाहने वेगात चालविता यावीत यासाठी महामार्गांची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र नागपूर ते छिंदवाडा हा ...
वसीम कुरेशी
नागपूर : वाहने वेगात चालविता यावीत यासाठी महामार्गांची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र नागपूर ते छिंदवाडा हा ६९ क्रमांकाचा महामार्ग वाढत्या अतिक्रमणांनी वेढला जात आहे. कारवाई करूनही या मार्गावरील ४० किलोमीटरपर्यंतच्या मार्गावर नाईलाजाने चालकांना कमी वेगातच जावे लागते.
महामार्गाच्या कडेलाच टिनांचे शेड टाकून दुकाने उभारली जात आहेत. अनेकांनी तर या ठिकाणी पक्के बांधकामही केले आहे. रोडच्या आरओडब्ल्यू (राइट ऑफ वे) दरम्यान मागील महिन्यात एक अभियान चालवून अनेक अतिक्रमणे पाडण्यात आली होती. आता पुन्हा अतिक्रमणे वाढायला लागली आहेत. महादुला, कोराडी मंदिर व वाकी गेटच्या समोरील दुकानांपुढेच वाहने उभी केली जातात. ग्राहकांची वाहनेही रोडवर उभी असतात. यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. दहेगाव ते सावनेरदरम्यान अनेक ठिकाणी प्लॉट पाडून मनमानीपणाने सुरक्षा भिंत आणि रस्ते तयार करण्यात आले आहेत. प्लॉटपर्यंत पोहोचण्यासाठी रोडवर लावण्यात आलेले क्रॅश बॅरियरसुद्धा कापण्यात आले आहेत.
एनएचएआयच्या अधिकृत सूत्रांच्या मते, अलीकडेच दुसऱ्यांदा ३५ जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. एकीकडे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाच्या नावाखाली नागपुरात कार्यक्रम चालविले जात असताना, महामार्गावर ही अवस्था आहे. यातून दोन्ही यंत्रणेमध्ये समन्वयाचा अभाव दिसत आहे.
...
कोट
महामार्गाच्या वेगवेगळ्या भागातील आरओडब्ल्यू वेगवेगळा असतो. काही मार्गांची रुंदी ६० मीटर तर काही ठिकाणी ४५ मीटर असते. आरओडब्ल्यूदरम्यान अतिक्रमण आढळल्याने महामार्ग- ६९ वर अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. मात्र पुन्हा अतिक्रमण सुरू असेल तर नव्याने कारवाई केली जाईल. लेआऊटपर्यंत कुणाला जोडमार्ग हवा असल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे.
- अभिजित जिचकार, प्रकल्प संचालक, एनएचएआय