बरे झालेले मनोरुग्ण होणार ‘आत्मनिर्भर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:09 AM2021-02-25T04:09:08+5:302021-02-25T04:09:08+5:30
वसीम कुरैशी लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ‘कोरोना’च्या कालावधीत ठीक झालेल्या मनोरुग्णांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा ...
वसीम कुरैशी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘कोरोना’च्या कालावधीत ठीक झालेल्या मनोरुग्णांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा व्यक्तींना व्यस्त ठेवणे हा देखील उपचाराचाच भाग आहे. या उद्देशाने मागील वर्षी प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरात ‘डे केअर सेंटर’ बनविण्याची सुरुवात झाली होती. या इमारतीचे कामदेखील पूर्ण झाले आहे. या माध्यमातून ठीक झालेले व्यक्ती केवळ व्यस्तच राहणार नाहीत तर त्यांना रोजगारदेखील मिळेल. त्यामुळे ते आत्मनिर्भर होतील व त्यांचे मनोबलदेखील वाढेल.
‘लॉकडाऊन’मुळे या मोहिमेला ‘ब्रेक’ लागला होता. आता परत ‘कोरोना’चे आकडे वाढत असल्याने प्रक्रिया काहीशी थंडावली आहे. मात्र ‘डे केअर सेंटर’मधील विविध उपक्रमांसाठी आवश्यक सामान, यंत्र, कॉम्प्युटर, कच्चा माल इत्यादी आला आहे. त्यांना केवळ योग्य ठिकाणी ठेवणे बाकी आहे. या केंद्रात लाभार्थ्यांना फाईल, लिफाफे, राखी, चटई इत्यादी बनविणे शिकविण्यात येईल. सद्यस्थितीत येथे रुग्णांसाठी आणण्यात येणारे पाव तुरुंगातून येतात. आता काही बेकरी प्रॉडक्ट्ससह पावदेखील याच केंद्रात बनतील. ठीक झालेल्यांच्या आवडीनुसार त्यांना काम देण्याचा प्रयत्न होईल.
‘डे केअर सेंटर’मध्ये महिला, पुरुष मिळून ५० जणांची व्यवस्था होईल. त्यांच्याद्वारे निर्मित उत्पादनांची विक्री होईल व त्याच्यातून मिळणाऱ्या महसुलाचे त्यांच्यातच वाटप करण्यात येईल.
बसने होणार वाहतूक
ठीक झालेल्या व्यक्तींना त्यांच्या घरापासून केंद्रापर्यंत आणणे व परत नेण्यासाठी बसची व्यवस्था होणार आहे. सकाळी ९ वाजता हे लोक घरातून केंद्राकडे रवाना होतील व दिवसभराचे काम संपवून सायंकाळी ६ वाजता परततील. कामादरम्यान मनोरंजन व्हावे यासाठी केंद्रात विशेष कक्षदेखील बनविण्यात आला असून, तेथे टीव्हीदेखील लावण्यात आला आहे. सोबतच चहा, नाश्ता इत्यादीसाठी ‘किचन’चीदेखील सोय आहे.
लवकरच सुरू होणार केंद्र
बऱ्या झालेल्या रुग्णांच्या पुनर्वसनासाठी निश्चित करण्यात आलेल्या कार्यक्रमांतर्गत ‘डे केअर सेंटर’ बनविण्यात आले आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, मनपा इत्यादींकडून ‘स्ट्रक्चरल ऑडिट, अग्निशमन व विद्युत परवानग्या घेण्यात येतील. त्यानंतर लगेच केंद्र सुरू होईल, अशी माहिती प्रादेशिक मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक पुरुषोत्तम मडावी यांनी दिली.