घराघरांत साथ, उपस्थितीवर परिणाम; शाळेतून मोठ्या प्रमाणात पसरतोय कंजेक्टीव्हायटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 02:36 PM2023-07-31T14:36:39+5:302023-07-31T14:44:18+5:30
सर, शाळेला येणार नाही...माझे डोळे आलेत
नागपूर : शहर आणि जिल्ह्यातील घराघरांत ‘कंजेक्टीव्हायटीस’ पसरला आहे. हा संसर्ग पसरण्याचे सर्वात मोठे माध्यम शाळा ठरताहेत. बहुतांश घरात सर्वात पहिले विद्यार्थ्यांचे डोळे येतात आणि घरातील प्रत्येक सदस्याला हा संसर्ग जडतो. डोळे आल्याने विद्यार्थ्यांच्या शाळा बुडत आहे, तर पालकांनाही कार्यालयाला सुटी मारावी लागत आहे. शहरातील काही शाळांचा आढावा घेतला असता, विद्यार्थ्यांच्या उपस्थिती ५० टक्केवर आल्याचे दिसत आहे.
वातावरणातील बदलांमुळे नागपुरात सर्दी, खोकल्यानंतर डोळे येण्याची म्हणजे कंजेक्टीव्हायटिसची साथ पसरली आहे. मेडिकल, मेयो या शासकीय रुग्णालयांतील नेत्ररोग विभाग तसेच नेत्ररोग तज्ज्ञांकडे, जनरल फिजिशियन यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांपैकी २५ टक्के रुग्ण कंजेक्टिव्हायटिसचे आहेत. जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेकडून खबरदारीचे उपाय करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ४ दिवसांचा हा आजार आहे. यावर वेळीच उपचार झाले तर तो नियंत्रणात येऊ शकतो. शाळेतून विद्यार्थ्यांच्या माध्यमातून या संसर्गाचा प्रसार जास्त होत आहे. विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांनाही संसर्ग होत असून, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीचा आकडा वाढत आहे.
कंजेक्टीव्हायटिस हा संसर्ग वातावरणामध्ये बदल झाल्याने सूक्ष्म जिवाणूंमुळे पसरतो. हा आजार फक्त शरीर संपर्काद्वारे आणि स्राव संपर्काद्वारे पसरू शकतो. विद्यार्थ्यांमध्ये हा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरण्यामागचे कारण की विद्यार्थी जवळ बसतात. एकमेकांच्या शालेय साहित्याला हात लावतात. एकत्र टिफिन खातात आणि आजाराबद्दल ते फार काळजी घेत नाही. विद्यार्थ्यांमुळे हा आजार घराघरांत पसरत आहे.
- डॉ. अनिल लांडगे, जनरल फिजिशियन
कंजेक्टीव्हायटीसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती ५० टक्केवर आली आहे. विद्यार्थ्यांमुळे घराघरांत तो पसरत चालला आहे. याचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने किमान ४ दिवसांचा सुट्या घोषित कराव्यात, जेणेकरून त्याची तीव्रता कमी करता येईल.
- बाळा आगलावे, राज्य सचिव, महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक महासंघ