आठ महिन्यांच्या अल्पकाळात आरोग्य आणि शिक्षणव्यवस्था सुधारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:09 AM2021-01-21T04:09:20+5:302021-01-21T04:09:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आपला कार्यकाळ १३ महिन्यांचा असला तरी काम करण्यासाठी आपल्याकडे फक्त आठ महिने आहेत. या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आपला कार्यकाळ १३ महिन्यांचा असला तरी काम करण्यासाठी आपल्याकडे फक्त आठ महिने आहेत. या काळात आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रांमध्ये उत्तम काम करणे हीच आपली प्राथमिकता असेल, असे प्रतिपादन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले.
महापौर तिवारी यांनी बुधवारी यवतमाळ हाउस येथे लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा यांची भेट घेतली. या प्रसंगी त्यांचा सत्कार करण्यात आला. चर्चेदरम्यान त्यांनी आपल्या भावी योजनांवर प्रकाश टाकला.
तिवारी म्हणाले, २००३ मध्ये आपण आरोग्य समितीचे अध्यक्ष असताना एक अहवाल दिला होता. त्यात महापालिकांच्या रुग्णालयांची स्थिती मांडून सुधारणेची गरज व्यक्त केली होती. अशा प्रकारचा अहवाल देणारे आपण पहिले अध्यक्ष होतो. त्या काळात महापालिकेच्या रुग्णालयात वेतनांवर १.७८ लाख रुपये खर्च व्हायचे तर, औषधांवर दर महिन्याला फक्त २,२७० रुपयांचा खर्च व्हायचा. म्हणूनच महापौर झाल्यानंतर आपण मनपाच्या रुग्णालयांची स्थिती सुधारण्याचा निर्णय घेतला.
या अंतर्गत ७५ वंदेमातरम् नागरी आरोग्य केंद्र उभारली जातील. ४८ केंद्रांसाठी जागाही निश्चित केली आहे. मनपा समाज भवन, वाचनालय, शाळांचे सभागृह आदी ठिकाणी हेल्थ पोस्ट बनविले जातील. यासाठी पाणी, वीज आणि जागेची व्यवस्था मनपाकडून केली जाईल. स्वयंसेवी संस्था औषध आणि आरोग्यसेवा उपलब्ध करून देतील. स्वातंत्र्यानंतर शहीद झालेल्या वीरांची नावे या केंद्रांना दिली जातील. नोंदणी शुल्क फक्त एक रुपया असेल.
या प्रकारे नव्या शैक्षणिक सत्रात इंग्रजी माध्यमाच्या ६ शाळा उघडल्या जातील. मुंबईतील एक एनजीओ यासाठी मदत करायला तयार आहे. शहरातील संस्थाही शाळा चालवायला इच्छुक आहेत. पाचवी ते दहावीपर्यंत शाळा चालविणाऱ्यांना काही बंद पडलेल्या शाळा चालविण्यासाठी देण्याची योजना आहे. या प्रसंगी उन्नती फाउण्डेशनचे अध्यक्ष अतुल कोटेचा प्रामुख्याने उपस्थित होते.
...
मनपाने उत्तम शैक्षणिक धोरण आखावे : दर्डा
माजी खासदार विजय दर्डा म्हणाले, शिक्षणाच्या अधिकाराचा कायदा आल्यापासून आता शिक्षणाचा हक्क प्रत्येक व्यक्तीचा झाला आहे. शैक्षणिक संस्था चालविण्याचा अनुभव असणाऱ्यांना मनपाच्या बंद पडलेल्या शाळा चालविण्याची जबाबदारी ५०-५० फार्म्यूल्यावर दिली जाऊ शकते. त्यांची सेवा असेल, मात्र वाजवी दरात शिक्षण मिळायला हवे. मनपाची तयारी असल्यास अनेक संस्था पुढे येऊ शकतात. मनपाने उत्तम शैक्षणिक धोरण आखले तरच त्याचे परिणाम चांगले येतील. शुद्ध पाण्याची व्यवस्था करावी लागेल. हेल्थ पोस्टसाठी स्वस्त किंवा नि:शुल्क औषधासाठी संपर्क करावा लागेल. यासाठी अनेक कंपन्या पुढे येऊ शकतील.
...