५०० हून अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी
By admin | Published: April 2, 2015 02:33 AM2015-04-02T02:33:34+5:302015-04-02T02:33:34+5:30
जैन सेवा मंडळ तसेच लोकमत सखी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने महाल येथील चिटणीस पार्क येथे बुधवारी नि:शुल्क आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
नागपूर : महावीर जयंतीनिमित्त दिगंबर जैन महासमिती-महाराष्ट्र, जैन सेवा मंडळ तसेच लोकमत सखी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने महाल येथील चिटणीस पार्क येथे बुधवारी नि:शुल्क आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ५०० हून अधिक नागरिकांनी याचा लाभ घेतला. यावेळी नागरिकांना आरोग्याबाबत उपयुक्त मार्गदर्शनदेखील करण्यात आले. लता मंगेशकर इस्पितळाच्या २५ डॉक्टरांच्या पथकाने आरोग्य सेवा प्रदान केली.
महापौर प्रवीण दटके हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. भगवान महावीर यांच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन करुन मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी लता मंगेशकर इस्पितळाचे चेअरमन व माजी मंत्री रणजित देशमुख, शहर महिला कॉंग्रेसच्या अध्यक्ष प्रज्ञा बडवाईक, जैन सेवा मंडळचे अध्यक्ष मनीष मेहता, शहर कॉंग्रेस कमिटीचे महासचिव अतुल कोटेचा, अभय पनवेलकर, दिगंबर जैन महासमितीच्या अध्यक्षा डॉ. ऋचा जैन, महासमितीचे सचिव दिलीप सावरकर, कार्याध्यक्ष सुनील पेंढारी, महामंत्री जयेश सहा, युवा शाखेचे सागर मिटकरी, महिला शाखेच्या रीना कासल, सतीश पेंढारी, दिलीप गांधी, लोकमत सखी मंचच्या ‘इव्हेन्ट आॅर्गनायझर’ नेहा जोशी, राजकुमार जैन हे प्रामुख्याने उपस्थित होते.
महावीर जयंतीच्या शुभेच्छा देत महापौरांनी या उपक्रमाच्या आयोजनासाठी जैन समाजाचे मनपा प्रशासनाकडून आभार मानले. या शिबिरात ‘स्वाईन फ्लू’वर जनजागृती करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले आहे हे कौतुकास्पद आहे. सामाजिक सेवेच्या कार्यांत जैन समाजाच्या मुनींचे मौलिक योगदान पहायला मिळते असे ते म्हणाले.
यावेळी जैन समाजातील नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या चार नव्या ‘प्रोजेक्ट’चे उद्घाटनदेखील झाले. दिगंबर जैन महासमितीच्या अध्यक्षा डॉ. ऋचा जैन यांनी या सर्व ‘प्रोजेक्ट’बाबत माहिती दिली. शहरातील इस्पितळांमध्ये जैन समाजाच्या नागरिकांना उपचारांत सूट मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. तसेच बचत झालेले पैसे महासमितीच्या माध्यमातून समाजातील गरीब, गरजू नागरिकांच्या मदतीसाठी उपयोगात आणले जातील.
यासोबतच बेरोजगार तरुणांना स्वयंरोजगारासाठी दिल्ली येथे ३ महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात येईल. सामान्यत: लोकांमध्ये असा समज असतो की जैन समाजाचे लोक श्रीमंत असतात. परंतु समाजातील २० टक्के लोक असे आहेत ज्यांच्याकडे भोजनाची व्यवस्था होऊ शकत नाही. अशा लोकांना मदत पोहोचविणे आवश्यक आहे. यासोबतच सरकारने जैन समाजाला अल्पसंख्यांकांचा दर्जा दिल्यानंतर आता समाजबांधवांना सर्व योजनांचा लाभ मिळवून देणे ही बाबदेखील या ‘प्रोजेक्ट’मध्ये समाविष्ट आहे. याकरिता लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
पंकज खेडकर यांनी भगवान महावीर यांना नमन करुन गीत सादर केले. संचालन राजू जैन वर्धावाले यांनी केले तर सुनील पेंढारी यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)