नागपुरातील कोरोना बाधितांची प्रकृती उत्तम : आणखी तीन रुग्ण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 11:01 PM2020-03-14T23:01:28+5:302020-03-14T23:02:55+5:30

आतापर्यंत १०२ संशयित रुग्णांमधून तब्बल ९६ नमुने निगेटिव्ह आले आहेत. शनिवारी पॉझिटिव्ह आलेल्या तीन रुग्णांमध्ये नागपूरचा एक तर दोन यवतमाळ जिल्ह्यातील रुग्ण आहेत. नागपुरात कोरोना बाधितांची संख्या चार तर विदर्भात सहा झाली आहे. मेडिकलमधील रुग्णांची प्रकृती उत्तम असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

The health of Corona Disorders in Nagpur is good: three more patients positive | नागपुरातील कोरोना बाधितांची प्रकृती उत्तम : आणखी तीन रुग्ण पॉझिटिव्ह

नागपुरातील कोरोना बाधितांची प्रकृती उत्तम : आणखी तीन रुग्ण पॉझिटिव्ह

Next
ठळक मुद्देघाबरून जाऊ नका : १०२ मधून ९६ नमुने निगेटिव्ह

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : कोरोना विषाणूला घाबरून जाऊ नका, पण सतर्क राहा. सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर थुंकू नका. हातांची नियमित स्वच्छता ठेवा. आरोग्य विभागाने सांगितलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी केल्यास या आजाराला दूर ठेवणे शक्य आहे. म्हणूनच आतापर्यंत १०२ संशयित रुग्णांमधून तब्बल ९६ नमुने निगेटिव्ह आले आहेत. शनिवारी पॉझिटिव्ह आलेल्या तीन रुग्णांमध्ये नागपूरचा एक तर दोन यवतमाळ जिल्ह्यातील रुग्ण आहेत. नागपुरात कोरोना बाधितांची संख्या चार तर विदर्भात सहा झाली आहे. मेडिकलमधील रुग्णांची प्रकृती उत्तम असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
अमेरिका प्रवासाची पार्श्वभूमी असलेला एक पुरुष रुग्ण ११ मार्च रोजी पॉझिटिव्ह आला. १२ मार्च रोजी या रुग्णाची पत्नी आणि या रुग्णासोबत अमेरिकेहून आलेला पुरुष रुग्णही पॉझिटिव्ह आला. दरम्यान, याच रुग्णासोबत अमेरिकेहून आलेल्या चार रुग्णांमध्ये लक्षणे आढळून आली. त्यांनी १३ मार्च रोजी मेडिकलमध्ये घशातील द्रव्याचे व रक्ताचे नमुने दिले. त्याचा अहवाल शनिवारी प्राप्त झाला. यात ४३ वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह आला. आतापर्यंत नोंद झालेल्या चार कोरोनाबाधित रुग्णांमधून तिघांवर मेडिकलमध्ये तर एकावर मेयोमध्ये उपचार सुरू आहेत. मेडिकलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये लक्षणे नाहीत. यामुळे त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी सांगितले.
यवतमाळमधील नऊमधून दोघे पॉझिटिव्ह
यवतमाळ जिल्ह्यातील नऊ लोकांचा समूह दुबई येथे प्रवासाला गेला होता. एक मार्च रोजी ते यवतमाळ येथे परतले. सुरुवातीला आरोग्य विभागाने त्यांना घरीच राहण्याचा सल्ला दिला होता. परंतु नागपुरात एक रुग्ण पॉझिटिव्ह येताच या रुग्णांना १२ मार्च रोजी यवतमाळ मेडिकलच्या आयसोलेशन वॉर्डात दाखल करण्यात आले. शुक्रवारी यांचे नमुने नागपूरच्या मेयो रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. शनिवारी प्राप्त झालेल्या नमुन्यांच्या अहवालात दोघे पॉझिटिव्ह आले. यामुळे विदर्भात आता कोरोनाबाधितांची संख्या सहा झाली आहे.

१५ नमुनेही निगेटिव्ह
शनिवारी मेयोच्या प्रयोगशाळेत कोरोना संशयितांचे १५ नमुने तपासण्यात आले. हे सर्वच नमुने निगेटिव्ह आले आहेत. या नमुन्यात मेडिकलचे आठ, मेयो रुग्णालयाचे चार, दोन चंद्रपूर जिल्ह्यातील तर एक वर्धा जिल्ह्यातील संशयित रुग्णांचे होते.

मेडिकलच्या ओपीडीत घेतले २५ नमुने
मेडिकलच्या ओपीडीत कोरोना विषाणूची शंका असलेले परंतु कुठलेही लक्षणे नसलेले असे २५ संशयितांचे नमुने गोळा करण्यात आले. हे नमुने रात्री उशिरा मेयोच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले.

Web Title: The health of Corona Disorders in Nagpur is good: three more patients positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.