नागपुरात १२०० डिलिव्हरी बॉईजची आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 11:31 PM2020-03-25T23:31:06+5:302020-03-25T23:32:22+5:30
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी घरपोच अन्न सेवा पुरविणाऱ्या १२०० डिलिव्हरी बॉईजच्या आरोग्य तपासणीला बुधवारपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी ३०० वर बॉईजची तपासणी करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी घरपोच अन्न सेवा पुरविणाऱ्या १२०० डिलिव्हरी बॉईजच्या आरोग्य तपासणीला बुधवारपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी ३०० वर बॉईजची तपासणी करण्यात आली. यासाठी आरोग्य विभागाच्या पाच डॉक्टरांची चमू तैनात करण्यात आली आहे. आमदार निवासात तपासण्यात आलेल्या या बॉईजमध्ये यातील एकालाही सर्दी, खोकला, तापाची लक्षणे आढळून आलेली नाहीत. नागपुरात ‘लॉकडाऊन’ असलेतरी घरपोच अन्न सेवा देणाऱ्या दोन कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉईजला यातून वगळण्यात आले आहे. यांच्या मार्फत मात्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून यांच्या आरोग्याची तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिले होते. त्यानुसार घरपोच अन्न सेवा पुरविण्यात अग्रेसर असलेल्या झोमॅटो व स्वीगीच्या ३०० डिलिव्हरी बॉईजला सिव्हील लाईन्स येथील आमदार निवासाच्या सभागृहात बोलविण्यात आले होते. यांच्या तपासणीसाठी जिल्हा आरोग्य विभागाकडून पाच डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली. वरिष्ठ डॉ. डॉक्टर नितीन गुल्हाने यांच्या मार्गदर्शनात डॉ.सरल देशमुख, डॉ. प्रज्ञा रामटेके, डॉ. अफसान तब्बसूम, डॉ. प्रशांत गिरी, डॉ. शिशिर गोस्वामी व डॉ. प्रशांत हिवरकर आदींनी या डिलिव्हरी बॉईजची तपासणी केली. तपासणीपूर्वी त्यांच्याकडून एक अर्जही भरुन घेण्यात आला. तपासणी नंतर डॉक्टरांनी त्यांना मार्गदर्शनही केले. हॉटेलमध्ये अन्नाचे पॅकेट घेण्यापूर्वी हाताची स्वच्छता, ग्लोव्हज व मास्क घालण्याचे महत्त्व, घरपोच अन्नाचे पॅकेट देताना विशिष्ट अंतर पाळण्याची खबरदारी घेण्यासही सांगितले. रोख स्वरुपात पैसे न घेता ऑनलाईन पेमेंट घेण्याच्या आदी महत्त्वाच्या सूचनाही देण्यात आल्या. पुढील काही दिवस ही तपासणी सुरू राहणार आहे. विशेष म्हणजे, रोजचा तपासणीचा अहवाल जिल्हाधिकारी आरोग्य विभागाला सादर करावयाचा आहे. ही मोहीम आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांच्या मार्गदर्शनात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय सेलोकर राबवित आहेत.