जिल्ह्याचे आरोग्य वाऱ्यावर
By admin | Published: June 27, 2017 02:13 AM2017-06-27T02:13:35+5:302017-06-27T02:13:35+5:30
पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात साथ रोगाचा प्रभाव जास्त असल्याने, जिल्ह्यातील आरोग्याची यंत्रणा सजग राहणे गरजेचे आहे.
४२ डॉक्टरांची पदे रिक्त : आरोग्यसेवकांचीही संख्या कमी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात साथ रोगाचा प्रभाव जास्त असल्याने, जिल्ह्यातील आरोग्याची यंत्रणा सजग राहणे गरजेचे आहे. परंतु आजच्या घडीला जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था डॉक्टर, परिचारिका, आरोग्यसेवकांअभावी कोलमडली आहे. ४९ प्राथमिक आरोग्य केंद्र, ३१६ उपकेंद्र, ७० आयुर्वेदिक व होमिओपॅथी दवाखाने, ७ नव्या आरोग्य केंद्राला मंजुरी मिळाली आहे. परंतु ही सर्व यंत्रणा कर्मचाऱ्यांअभावी लुळी पडली आहे. त्यामुळे जि.प.च्या सदस्यांनी आरोग्यविषयक चिंता व्यक्त केली आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात एकूण ११६ डॉक्टरांची पदे मंजूर आहेत. मात्र, ही पदे भरण्याबाबत शासन उदासीन आहे. त्यामुळे तब्बल ४२ डॉक्टरांची पदे रिक्त असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात पुरेसे डॉक्टरच नाही. उपलब्ध असलेल्या डॉक्टरांवर कामाचा ताण पडत असून एका डॉक्टरांना तीन डॉक्टरांचे कामे करावे लागते.
दुसरीकडे जिल्ह्यातील ४९ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आरोग्यसेवकांची १९९ पदे मंजूर आहेत. त्यापैकी १११ पदे भरण्यात आली असून, अजूनही ८८ पदे रिक्त आहेत. परिचारिकांची दोन वर्षापासून भरती झालेली नाही. अनेक उपकेंद्रामध्ये कंत्राटीवर परिचारिका आहेत. आरोग्य विभागात प्रशासकीय अधिकारी नाही. उपजिल्हा आरोग्य अधिकाऱ्याच्या तीन जागा रिक्त आहेत. कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. त्यामुळे अतिरिक्त कामाचा ताण पडतो आहे. पावसाळ्यात निर्माण होणारी दुर्गंधी, घाणीमुळे डासांचा वावर वाढतो.
त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पीएचसीमध्ये असलेल्या फॉगिंग मशीन बंद आहे. उपकेंद्रामध्ये औषधांची कमतरता आहे. मूलभूत सोईसुविधा उपलब्ध नाहीत.
शासनाचेच दुर्लक्ष आहे
पूर्वी सीईओंकडे रिक्त पदांच्या भरतीचे अधिकार होते. आता आरोग्य उपसंचालकाकडून पद भरती होते. जिल्ह्याचा आरोग्याचा व्याप एवढा मोठा असताना पदभरती नाही. उपकेंद्र ओस पडलेले आहे. राज्याचे आरोग्य मंत्री डॉक्टर आहेत. जिल्ह्याचा कारभार चालविणाऱ्या डॉक्टर आहेत. सोबत मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे. तरीही दुर्लक्ष आहे. यावर्षी जिल्हा नियोजन समितीतून आरोग्य विभागाला पैसे देण्यात आले नाही. रुग्ण कल्याण समितीला फक्त एक लाख मिळते. शासनाने पैसा वाढविला पाहिजे. फ्लार्इंग स्कॉड नाही. आरोग्य केंद्राला भेटी देण्यात येत नाही. आढावा घेतल्या जात नाही. डीएचओची मुजोरी वेगळी आहे.
- चंद्रशेखर चिखले,
माजी उपाध्यक्ष, जि.प.
शिवकुमार यादव, सदस्य
कोलमडलेली स्थिती आहे
हिंगणा तालुक्यातील आरोग्य केंद्र, उपकेंद्रामध्ये डॉक्टरांचा अभाव आहे. परिचारिका नाही, पॅथॉलॉजीची सोय नाही. रुग्णांना व्यवस्था मिळत नाही. कान्होलीबारा आरोग्य केंद्रात डॉक्टरसुद्धा नाही. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्याच्या दृष्टीने आरोग्यसेवकाकडून सर्वे नाही. साथीच्या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी जनजागृती नाही. आपत्कालीन व्यवस्था नाही.
- उज्ज्वला बोढारे, सदस्य, जि.प.
जिल्ह्याचे आरोग्य बिघडले आहे.
आरोग्य केंद्रात औषधी नाही, फॉगींग मशीन बंद आहे. डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. डीएचओ केवळ मिटींगमध्ये व्यस्त आहे. कामाची सिस्टम नाही. त्यामुळे जिल्ह्याचे आरोग्य बिघडले आहे.
- शिवकुमार यादव, सदस्य, जि.प.