"दहा वर्षांत आरोग्य सुविधा दुपटीने वाढल्या"; ‘लोकमत टाइम्स एक्सलन्स इन हेल्थकेअर अवॉर्डस्’चे थाटात वितरण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 10:14 AM2023-10-13T10:14:55+5:302023-10-13T10:19:27+5:30
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी मांडला आरोग्याच्या प्रगतीचा आलेख...
नागपूर : गेल्या दहा वर्षांत आरोग्यावरील बजेटमध्ये चार ते पाच पटीने वाढ केली असून, त्यात यावर्षी आणखी ७ हजार कोटींची वाढ केली आहे. २०१४ मध्ये २० ते २३ हजार कोटींवर असलेले आरोग्यावरील बजेट गेल्यावर्षी ९० हजार कोटींवर पोहोचले, असे सांगत एकूणच आरोग्य सुविधा दुपटीने वाढल्या असल्याचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी सांगितले.
‘लोकमत टाइम्स एक्सलन्स इन हेल्थकेअर अवॉर्ड्स’चा दिमाखदार सोहळा बुधवारी हॉटेल सेंटर पॉइंट येथे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या मुख्य उपस्थितीत पार पडला. अध्यक्षस्थानी ज्युरी बोर्डचे अध्यक्ष व ज्येष्ठ न्यूरो फिजिशियन डॉ. चंद्रशेखर मेश्राम होते.
प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून प्रसिद्ध नेत्रचिकित्सक व माजी खासदार, पद्मश्री डॉ. विकास महात्मे, तर सन्माननीय अतिथी म्हणून ‘लोकमत एडिटोरिअल बोर्ड’चे चेअरमन व माजी खासदार डॉ. विजय दर्डा, ज्युरी बोर्डचे सचिव ज्येष्ठ रेडिओलॉजिस्ट डॉ. राजू खंडेलवाल, ‘लोकमत टाइम्स’चे संपादक एन. के. नायक, ‘लोकमत समाचार’चे ज्येष्ठ संपादक विकास मिश्र, ‘लोकमत’चे संपादक श्रीमंत माने उपस्थित होते.
या सरकारच्या काळात जनऔषधी योजनेमुळे स्वस्तात औषध उपलब्ध झाले. आयुष्मान भारत योजनेंतर्गत पाच लाख रुपयांचा विमा सामान्य नागरिकांना मिळणार आहे. एमबीबीएसला २०१४च्या तुलनेत दुप्पट विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जात आहेत. मेडिकल कॉलेजही दुपटीने वाढले.
- डॉ. भागवत कराड, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री
आरोग्य सेवा परवडणारी व्हावी -
देशातील आरोग्य क्षेत्राकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. आरोग्य सेवा ही परवडणारी असावी, अन्यथा लोकांचा विश्वास उडेल. मेडिकल शिक्षण महाग होत आहे. मेडिकलच्या जागा वाढविण्याची आवश्यकता आहे. खासगी दवाखान्यांमध्ये लागणारी उपकरणे महाग झाली आहेत. परिणामी रुग्णाला स्वस्त आरोग्य सेवा मिळत नाही. त्यामुळे खासगी हॉस्पिटलला लागणारी जमीन व वैद्यकीय उपकरणे स्वस्तात मिळावी, अशी व्यवस्था सरकारने करायला हवी.
- डॉ. विजय दर्डा, लोकमत एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार
हॉस्पिटल मॅनेजमेंट स्पेशालिस्ट असावे
हॉस्पिटल मॅनेजमेंट हे स्पेशालिस्ट काम आहे. ज्या पद्धतीने हॉटेल मॅनेजमेंटसाठी त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तीचा विचार केला जातो. मग हॉस्पिटल मॅनेजमेंटसाठी त्या क्षेत्रातील स्पेशालिस्ट व्यक्ती का नको? ही मानसिकता बदलण्याची गरज आहे. या कामासाठी तज्ज्ञ व्यक्तीचीच निवड केली जावी.
-पद्मश्री डॉ. विकास महात्मे, माजी खासदार