नागपूर जिल्ह्यातील टाकळघाटवासीयांचे आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 11:59 AM2018-06-30T11:59:21+5:302018-06-30T12:00:46+5:30
टाकळघाट गावालगत असलेल्या औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीतून विशेषत: रात्रीच्या वेळी भरमसाट धूर सोडला जातो. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचेही दुर्लक्ष झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : टाकळघाट गावालगत असलेल्या औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीतून विशेषत: रात्रीच्या वेळी भरमसाट धूर सोडला जातो. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचेही दुर्लक्ष झाले आहे. परिणामी ग्रामस्थांमध्ये प्रचंड असंतोष आहे.
टाकळघाट गावालगत असलेली ही कंपनी नागरिकांसाठी आता डोकेदुखी ठरू लागली आहे. या कंपनीतून रात्रीच्या वेळी रसायनयुक्त धूर हवेत सोडला जातो. त्यामुळे नागरिकांना विविध आजारांची लागण होऊ लागली आहे. प्रदूषणाामुळे नागरिकांचा श्वासही गुदमरत असल्याचे नागरिकांनी सांगितले. याच परिसरात झोपडपट्टी असून तेथील नागरिकांनाही समस्यांचा सामना करावा लागतो. याबाबत नागरिकांनी सदर कंपनीला निवेदन देऊन प्रदूषित धूर बंद करण्याची मागणी केली. धूर बंद न केल्यास आंदोलन करू, असा इशाराही यावेळी देण्यात आले.
सोबतच प्रदूषण नियंत्रण मंडळानेही याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
कृष्णा नदीही प्रदूषित
टाकळघाटला लागून असलेली कृष्णा नदी ही येथील जनावरांसाठी व नागरिकांसाठी जीवनदायी आहे. परंतु या परिसरातील काही कंपन्या दूषित पाणी कृष्णा नदीत सोडतात. त्यामुळे ही नदीही आता प्रदूषित झाली आहे. दूषित आणि रसायनयुक्त पाण्यामुळे नदीतील पाणी जनावरांनाही पिण्यास योग्य नाही. याकडेही प्रदूषण नियंत्रण मंडळाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.