हेल्थ लायब्ररी, फॅटी लिव्हरचे आरोग्यावर होणारे परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:11 AM2021-08-15T04:11:19+5:302021-08-15T04:11:19+5:30

-फॅटी लिव्हर कसे ओळखावे? फॅटी लिव्हरची लक्षणे दिसून येत नाहीत. यामुळे बऱ्याच लोकांना हे देखील कळत नाही की ते ...

Health Library, Effects of Fatty Liver on Health | हेल्थ लायब्ररी, फॅटी लिव्हरचे आरोग्यावर होणारे परिणाम

हेल्थ लायब्ररी, फॅटी लिव्हरचे आरोग्यावर होणारे परिणाम

Next

-फॅटी लिव्हर कसे ओळखावे?

फॅटी लिव्हरची लक्षणे दिसून येत नाहीत. यामुळे बऱ्याच लोकांना हे देखील कळत नाही की ते फॅटी लिव्हरने ग्रस्त आहेत. मळमळ, वरच्या ओटीपोटात दुखणे ही सामान्य लक्षणे काही लोकांमध्ये दिसून येऊ शकतात. काही लोकांमध्ये रक्तात ‘लिव्हर एंजाइम’ची मात्र वाढू शकते. याचे निदान पोटाचा अल्ट्रासाऊंड तपासणीतून होते.

-फॅटी लिव्हरचे विविध प्रकार?

रोज मद्यपान करणाऱ्यांमध्ये फॅटी लिव्हर सामान्य आहे. परंतु अल्कोहोल न पिणाऱ्यांमध्येही ते मोठ्या प्रमाणात दिसून येते. याला ‘एनएएफएलडी’ किंवा ‘नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज’ म्हणतात. जास्त प्रमाणात चरबीमुळे यकृतावर सूज देखील दिसून येते, ज्याला ‘नेश’ किंवा ‘नॉन-अल्कोहोलिक स्टीटो हिपॅटायटिस’ म्हटले जाते.

-अ‍ॅडव्हान्स फॅटी लिव्हरची लक्षणे?

यामध्ये ‘लिव्हर सिरोसिस’च्या सर्व लक्षणांचा समावेश असतो. पोटात पाणी जमा होणे, पायावर सूज येणे, कावीळ होणे, रक्ताची उलटी होणे आणि शौचातून रक्त जाणे. तिळाचा आकार देखील मोठा होतो. रुग्णाला भूक लागत नाही. चक्कर येते, डोळे पिवळे होतात आणि पोटाच्या उजव्या आणि वरच्या भागात वेदना होतात.

-‘एनएएफएलडी’ कोणाला होतो?

याचे उत्तर तज्ज्ञांकडेही नाही, काहींचा लिव्हरमध्ये मोठ्या प्रमाणात चरबी साठवली जाते तर काहींमध्ये तसे होत नाही. फॅटी लिव्हर हा लिव्हर सिरोसिसमध्ये कसा बदलतो, याबाबतही फार कमी माहिती आहे. लठ्ठपणा, इन्सुलिन रेजिस्टेंस, उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा प्री-डायबिटीज, रक्तातील चरबीचे उच्च स्तर आदींचा थेट संबंध हा अल्कोहोल न घेणाऱ्यांमध्ये फॅटी लिव्हरच्या समस्यांशी संबंधित आहे.

-फॅटी लिव्हरचा धोका वाढवणारे घटक आणि रोग?

रक्तातील कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराईड्सची जादा मात्रा, मेटाबोलिक सिंड्रोम, लठ्ठपणा (जिथे चरबी पोटाभोवती जास्त असते), पॉलीसिस्टिक ओवेरियन सिंड्रोम, स्लीप अ‍ॅपनिया, टाइप-२ मधुमेह व थायरॉईडची कमकुवत कार्ये जोखीम वाढवतात.

-फॅटी लिव्हरमुळे होणाऱ्या समस्या?

जरी तुम्ही अल्कोहोल पीत नसाल किंवा पूर्णपणे शाकाहारी असाल, तरी तुम्ही फॅटी लिव्हर आणि नंतर लिव्हर सिरोसिसला बळी पडू शकता. सिरोसिस प्रत्यक्षात यकृतातील जखमेनंतरची स्थिती आहे. जेव्हा यकृत दाह थांबवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा काही फोड किंवा फायब्रोसिसची स्थिती निर्माण होते. सतत सूज आल्यानंतर फायब्रोसिस अधिकाधिक यकृताच्या ऊतींना घेरतो. मद्यपान करणाऱ्यांमध्ये लिव्हर ट्रान्सप्लांटचे सर्वात मोठे कारण फॅटी लिव्हरनंतर होणारे लिव्हर सिरोसिस ठरते.

-फॅटी लिव्हरचा धोका कसा कमी करावा?

भाज्या, फळे, संपूर्ण धान्य आणि निरोगी चरबीयुक्त आहार निवडायला हवा. जर तुमचे वजन जास्त असेल तर तुमच्या आहारातील कॅलरीज कमी करायला हवे. वजनावर नियंत्रण व नियमित व्यायाम हाच यावर पर्याय आहे.

-फॅटी लिव्हरचे निदान करणाऱ्या चाचण्या?

बहुतेक लोकांना कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. यामुळे पोटाच्या अल्ट्रासाऊंडद्वारे त्याचे निदान केले जाते. याशिवाय, संपूर्ण ‘ब्लड काऊंट’, ‘लिव्हर फंक्शन टेस्ट’, हिपॅटायटिस ए, बी, सी आणि ई सोबतच व्हायरल इन्फेक्शनच्या चाचण्यातून स्थिती आणि तीव्रता दिसून येते. ‘एचबीए १ सी’सह मधुमेह चाचणी आणि लिपिड प्रोफाइल केले जाते.

-फॅटी लिव्हरवर औषधी?

फॅटी लिव्हरवर दुर्दैवाने कुठलीही औषधी उपलब्ध नाही. काही औषधांच्या ‘ट्रायल’ सुरू आहेत. ‘व्हिटॅमिन ई’, कॉफीमुळे काही प्रमाणात फायदा होऊ शकतो. परंतु हे सिद्ध झालेले नाही. सिरोसिस गंभीर झाल्यावर ट्रान्सप्लांट हाच एकमेव पर्याय उरतो.

Web Title: Health Library, Effects of Fatty Liver on Health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.