हेल्थ लायब्ररी : झिका विषाणू परत आला का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:06 AM2021-07-11T04:06:58+5:302021-07-11T04:06:58+5:30
- झिका विषाणूच्या संसर्गाची मुख्य लक्षणे कोणती? झिका विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे ३७.८ ते ३८.५ डिग्री सेल्सिअसपर्यंत ताप येतो. चेहऱ्यावर, ...
- झिका विषाणूच्या संसर्गाची मुख्य लक्षणे कोणती?
झिका विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे ३७.८ ते ३८.५ डिग्री सेल्सिअसपर्यंत ताप येतो. चेहऱ्यावर, हात-पायांवर, तळवे व तळपायावर खाज सुटणारे पुरळ येतात. हात आणि पायांच्या छोट्या सांधे दुखायला लागतात. विनापस असलेला पुरळ डोळ्यात होऊन ‘कंजक्टिवायटिस’ होतो. यापैकी दोन किंवा अधिक लक्षणे आढळून आल्यास झिका विषाणूची लागण होण्याची शक्यता वाढते. इतर लक्षणामध्ये अंगदुखी, डोळ्याच्या मागील भागात दुखणे आणि डोकेदुखीचा समावेश आहे. काही लोकांमध्ये पोटात दुखणे, मळमळणे आणि अतिसारदेखील दिसून येतो. एन्सेफेलायटीस, ट्रान्सव्हर्स मायलायटिस आणि गुइलिन बॅरे सिंड्रोमदेखील दिसून येऊ शकतात.
-निदान कसे केले जाते?
वरील लक्षणे भारतात महत्त्वपूर्ण मानली जातात. अलीकडे केरळला भेट दिली तरीही याची भीती वाढते. तपासणीसाठी रक्त आणि लघवीचे नमुने घेतले जातात. झिका विषाणूविरुद्ध ‘आयजीएम अँटीबॉडीज’चे मूल्यांकनदेखील महत्त्वपूर्ण ठरते.
-झिका विषाणूशी मिळतेजुळते इतरही संक्रमण?
चिकुन गुन्या, पार्वोव्हायरस, रुबेला सारखा ताप, सांधेदुखी, त्वचेवर पुरळ, डोकेदुखी तसेच गोवर, लेप्टोस्पायरोसिस, मलेरिया, रिकेटसियल इन्फेक्शन आणि स्ट्रेप्टोकोकल इन्फेक्शन्सची तपासणीची सुद्धा गरज पडते.
-झिका विषाणू मानवी शरीरात कसा प्रवेश करतो?
लोकांमध्ये अनेक आजार असतात. झिका संक्रमित व्यक्तीच्या लक्षणांच्या पहिल्या आठवड्यात, डास झिका विषाणू वाहून नेतो आणि नंतर इतर व्यक्तींना चावण्याने तो पसरतो. याला जबाबदार असलेल्या डासाचे नाव ‘एडिस एजिप्टी’ आहे. डेंग्यू आणि चिकुन गुन्याचा प्रसारही याच डासामुळे होतो. झिका विषाणू हा गर्भवती महिलेपासून तिच्या
गर्भाशयातही संक्रमित होऊ शकतो. गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या काळात झिका विषाणूमुळे बाळाच्या मेंदूत दोष आढळून आले आहेत. हा आजार स्तनपानातून पसरत नाही. यामुळे गर्भवती महिला व मुलांना डासापासून वाचविणे गरजेचे आहे.
-झिका विषाणू पहिल्यांदा कधी सापडला?
झिका व्हायरसचे नाव युगांडाच्या झिका जंगलांवर पडले. येथे पहिल्यांदा, १९४७ मध्ये हा विषाणू आढळला. उष्णकटिबंधीय आफ्रिकेव्यतिरिक्त, झिका विषाणूच्या संसर्गाचा प्रसार भारतासह दक्षिणपूर्व आशियामध्येही दिसून येतो.
-झिका विषाणूवर उपचार?
झिका विषाणूवर तूर्तासतरी ठोस उपचार नाही. केवळ लक्षणांच्या आधारावर उपचार केले जातात. तोंडावाटे भरपूर प्रमाणात द्रव्य पदार्थ दिले जातात. तापावर ‘पॅरासिटामोल’ दिली जाते. विशेष म्हणजे, योग्य निदान होणे गरजेचे असते. यात डेंग्यू, फेल्सिपेरम मलेरियासारखे आजार नसल्याचे स्पष्ट व्हायला हवे. काही प्रकरणांमध्ये तातडीने रुग्णालयात दाखल करणे आवश्यक ठरते.
-झिका विषाणूंविरुद्ध लसीची स्थिती?
या दिशेने महत्त्वपूर्ण प्रगती झाली आहे. प्राण्यांवरील अभ्यास पूर्ण झाले आहेत. मानवावर पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचण्यादेखील पूर्ण झाल्या आहेत. ‘जिकीवी’ने (झिका विषाणू) अमेरिकन खंडात आणि जगाच्या इतर काही भागांत महामारीचे रूप धारण केले होते. याची पुढची लाट कधी येईल हे सांगता येत नाही. साथीच्या आजाराचा सामना करण्यासाठी प्रभावी लस आणि अँटी-व्हायरल औषधे आवश्यक आहेत.
झिका विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी डासांवर नियंत्रण आणि डासांच्या चावण्यापासून स्वत:चा बचाव हाच यावर उपाय आहे.