हेल्थ लायब्ररी-भारतीय युवकांमध्ये हृदयविकाराचा धोका अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:12 AM2021-09-05T04:12:16+5:302021-09-05T04:12:16+5:30
-हृदयविकाराचे कारण? आपले हृदय जन्मापासून मृत्यूपर्यंत सतत कार्य करीत असते. रक्ताद्वारे स्नायूंना ऊर्जेचा पुरवठा आवश्यक असतो. हे कार्य आपल्या ...
-हृदयविकाराचे कारण?
आपले हृदय जन्मापासून मृत्यूपर्यंत सतत कार्य करीत असते. रक्ताद्वारे स्नायूंना ऊर्जेचा पुरवठा आवश्यक असतो. हे कार्य आपल्या हृदयातील तीन मुख्य कोरोनरी धमन्यांद्वारे होत असते. यामध्ये अडथळे म्हणजे ‘ब्लॉकेज’ आल्यास हृदयविकाराचा झटका येतो. ‘कोरोनरी थ्रोम्बोसिस’च्या पहिल्याच हल्ल्यात अनेक तरुणांचा मृत्यू होऊ शकतो.
-हे इतके सामान्य का झाले आहे?
या बदलाची अनेक कारणे आहेत. स्पर्धात्मक युगात स्वत:ला टिकवून ठेवण्यासाठी अनेक तरुण खूप तणावातून जातात. तीव्र तणावामुळे रक्तातील ग्लुकोज, कोलेस्टेरॉल आणि रक्तदाब वाढतो. सततच्या तणावामुळे तो दारू किंवा ड्रग्स किंवा सिगारेटसारख्या व्यसनाला बळी पडतो. परिणामी, वजन वाढते आणि धोकादेखील वाढतो.
-सर्वांत मोठा जोखीम घटक कोणता?
उच्च कोलेस्ट्रॉॅलची पातळी, उच्च रक्तदाब, मधुमेह, तंबाखूचा वापर आणि व्यायामाचा अभाव यामुळे अकाली ‘प्रिमेच्योर एथेरोस्लेरोसिस’ होऊ शकतो. सतत तणाव किंवा खूप तणावदेखील मृत्यूचे कारण ठरू शकते.
-या प्रकरणात भारतीय कसे वेगळे आहेत?
अनुवंशिकदृष्ट्या भारतीयांना ‘कोरोनरी आर्टरी डिसीज’चा धोका अधिक राहतो. काही कुटुंबांमध्ये अकाली हृदयविकाराचा झटका आणि मृत्यू सामान्य झाला आहे. वास्तविक आपल्या कोरोनरी धमन्या लहान आहेत. दुसरीकडे आपल्या आहारात अधिक प्रमाणात ‘कार्बोहायड्रेट्स’ आणि ‘ट्रांस फॅटी ॲसिड्स’ असतात. परिणामी वजन वाढते. पोट वाढण्याकडेही सामान्यप्रमाणे पाहतो. ज्यामुळे उच्च रक्तदाब आणि मधुमेह आणि रक्तातील असामान्य लिपिड्स’चे कारण ठरते. पाश्चात्त्य देशांपेक्षा आपल्या देशातील लोक सरासरी १० वर्षांपूर्वी कोरोनरी धमनी रोगाचे बळी पडतात.
-आपल्या हृदयाला काय कमकुवत करते?
धूम्रपान, उच्च कोलेस्टेरॉल, उच्च रक्तदाब, मधुमेह व व्यायामाच्या अभावामुळे कोरोनरी धमन्या कडक होतात. यामुळे अचानक ‘थ्रोम्बोसिस’चा धोका वाढतो. वयाच्या २० वर्षांनंतर प्रत्येकाने दरवर्षी संपूर्ण वैद्यकीय तपासणी केली पाहिजे.
-तरुणांनी हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी कोणत्या चाचण्या आवश्यक आहेत?
वेळोवेळी चाचण्या करून रक्तदाब, मधुमेह, कोलेस्टेरॉलच्या पातळीवर लक्ष ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याचे योग्यरीत्या रेकॉर्डही ठेवले पाहिजे. उंचीनुसार वजन ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा. धूम्रपान आणि अल्कोहोल टाळायला हवे.
-वार्षिक चाचण्या का आवश्यक आहेत?
बहुतांश वेळा तरुणांमध्ये उच्च रक्तातील ग्लुकोज, उच्च कोलेस्टेरॉल आणि उच्च रक्तदाबाची लक्षणे दिसून येत नाहीत. म्हणूनच त्याला ‘सायलेंट किलर’ म्हटले जाते. मृत्यू किंवा मोठा हृदयविकाराचा झटका हेच एकमेव लक्षण ठरते. म्हणून चाचण्या गरजेच्या ठरतात.
-व्यायामाशी संबंध?
चालणे, सायकल चालवणे, पोहणे आणि धावण्याच्या व्यायामाची सामान्यत: शिफारस केली जाते. ‘सिक्स पॅक ॲब्स’ किंवा ‘मोठे बायसेप्स’ तुम्हाला हृदयविकारापासून वाचवू शकत नाहीत. वजन कमी करण्यासाठी किंवा स्नायूंचे प्रमाण वाढवण्यासाठी पूरक आहार घेणे धोकादायक आहे. कोणताही व्यायाम सुरू करण्यापूर्वी, आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणेही आवश्यक आहे. दररोज ३० मिनिटे वेगाने चालणेदेखील पुरेसे आहे.
-हृदयविकाराच्या कोणत्या लक्षणांकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते?
अस्वस्थ वाटणे किंवा प्रचंड घाम येणे. अचानक अशक्तपणा जाणवणे, अचानक श्वास लागणे किंवा जबडा किंवा दात दुखणे, वरच्या ओटीपोटात किंवा पाठीत दुखणे, उलट्या होणे, ढेकर येणे, चक्कर येणे किंवा थकल्यासारखे डोळ्यांसमोर अंधार पसरणे, ही सर्व हृदयविकाराच्या सुरुवातीची लक्षणे आहेत; परंतु याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता अधिक असते. काही प्रकरणांमध्ये ही लक्षणेही दिसून येत नाहीत. अशा वेळी मृत्यू हे पहिले आणि शेवटचे लक्षण असते.