राज्यात कोरोनाची चौथी लाट येणार? आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2022 11:52 AM2022-05-23T11:52:13+5:302022-05-23T12:33:57+5:30
राज्यात कोरोनाची चौथी लाट येणार का? याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली. ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
नागपूर : देशात काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याचं दिसून आलं आहे. भारतात कोरोनाचा नवा BA.4 आणि BA.5 व्हेरिअंट सापडला आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. अशातच राज्यात कोरोनाची चौथी लाट येणार का? याबाबत राज्याचे आरोग्यमंत्रीराजेश टोपे यांनी माहिती दिली. ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
कोरोनाची परिस्थिती गंभीर नाही. एकंरदरीत सध्या राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा चांगला परिणाम दिसून येतोय. कोरोनाच्या रुग्णांची नोंद होतेय, कारण नागिरक गर्दी करताहेत, मेळावे भरतायत तसंच राजकीय कार्यक्रमदेखील होत असून इथे लोकं एकमेंकांना भेटतायत. मात्र अपेक्षेप्रमाणे रुग्णसंख्येत वाढ होत नाहीये. तसेच, लसीकरणही चांगलं झालं असून रुग्ण जास्त नसल्याने फार मोठा विषय नाही. कोरोनाच्या रुग्णांची नोंद पाहता काळजी करण्याचं कारण नाही. राज्यात चौथ्या लाटेची शक्यता वाटत नाही, असे टोपे म्हणाले.
तर, बुस्टर डोजबाबत केंद्राने सूचना दिल्या आहे, त्यानुसार बुस्टर डोज नागरिकांना देण्यात येत आहे. ॲंटीबॉडीजची टेस्ट करुन लोकांनी बूस्टर डोसबाबत निर्णय घ्यावा असेही आरोग्यमंत्री म्हणाले.
संभाजीराजेंबाबत बोलताना राजेश टोपे म्हणाले, आम्ही सर्व छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचाराचे आहोत. संभाजीराजेंबद्दल आम्हा सर्वांना आदर आहे. ते पूर्वश्रमीचे राष्ट्रवादीचे आहेत. त्यांना लोकसभेची उमेदवारीदेखील दिली होती. शरद पवारांशी, आमच्याशी त्यांचे आपुलकीचे संबंध आहेत. पक्षश्रेष्ठी आणि महाविकास आघाडी यासंदर्भातील निर्णय घेतील.
आशिष जयस्वाल यांनी मंत्र्यांकडून विकासकामांसाठीच्या निधी वाटपात भेदभाव होत असल्याचे म्हटले होते, यावर विचारले असता, जयस्वाल हे हाडाचे कार्यकर्ते आहेत. त्यांच्या मतदारसंघाचा विकास व्हायलाच हवा, ही महाविकास आघाडीची जबाबदारी आहे. आम्ही सर्व मिळून त्यांच्या मतदारसंघाचा विकास करून दाखवू, अशी प्रतिक्रिया टोपेंनी दिली.