आरोग्यमंत्र्यांनी घेतला मनोरुग्णालयातील अधिकाऱ्यांचा क्लास!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2022 08:21 PM2022-05-23T20:21:34+5:302022-05-23T20:22:27+5:30
Nagpur News प्रादेशिक मनोरुग्णालयात औषधींचा तुटवडा, कर्मचाऱ्यांची रिक्त संख्या व तुंबलेल्या गटारीकडे लक्ष वेधून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रुग्णालयातील डॉक्टर व अधिकाऱ्यांचा चांगलाच ‘क्लास’ घेतला.
नागपूर : प्रादेशिक मनोरुग्णालयात औषधींचा तुटवडा, कर्मचाऱ्यांची रिक्त संख्या व तुंबलेल्या गटारीकडे लक्ष वेधून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रुग्णालयातील डॉक्टर व अधिकाऱ्यांचा चांगलाच ‘क्लास’ घेतला. रुग्णालयातील उणिवा तातडीने दूर करा, आवश्यक गोष्टींचा प्रस्ताव पाठवा, असे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
आरोग्यमंत्री टोपे यांनी सोमवारी नागपुरात येऊन येथील आरोग्य विभागाचा आढवा घेतला. सिव्हिल लाइन्स येथील रविभवनात अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन त्यांनी थेट कोराडी रोडवरील प्रादेशिक मनोरुग्णालय गाठले. प्राप्त माहितीनुसार, सर्वप्रथम त्यांनी रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागाला (ओपीडी) भेट दिली. येथील रुग्णांशी संवाद साधला. यावेळी एका रुग्णाने औषधी कमी मिळत असल्याचे तर एका रुग्णाने काही औषधी बाहेरून विकत घ्यावे लागत असल्याच्या तक्रारी मांडल्या. आरोग्यमंत्री टोपे यांनी लागलीच औषधांचा प्रश्न सोडविता येईल, असे रुग्णाला आश्वासन देत अधिकाऱ्यांना यामधील समस्या सोडविण्याचा सूचना केल्या.
- डे-केअर सेंटरलाही दिली भेट
राजेश टोपे यांनी मनोरुग्णालयाच्या ‘डे-केअर सेंटर’ला भेट दिली. सोबतच पुनर्वसन केंद्राची पाहणी करीत रुग्णांच्या पुनर्वसनासाठी दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षण कार्याचे कौतुकही केले. यावेळी टोपे यांनी झाडू तयार करणाऱ्या एका महिला रुग्णाची आस्थेने विचारपूस केली.
- आठ वर्षे होऊनही मी रुग्णालयातच!
रुग्णांची विचारपूस करीत असताना लता नावाच्या एका महिला रुग्णाने आरोग्यमंत्र्यांना भेटून आपली कैफियत मांडली. त्या म्हणाल्या, मानसिक आजारातून बरे झाले. परंतु घरातील कोणी माणसे घेऊन जात नाहीत. ८ ते ९ वर्षे झाले मी रुग्णालयातच आहे. येथून बाहेर काढून मला पुनर्वसनासाठी रुग्णालयाबाहेरील ‘मानव विकास संस्था’ येथे पाठवा, अशी विनंती केली. यावर लागलीच टोपे यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक ती मदत करण्याचा सूचना केल्या.
- तुंबलेल्या गटारीने वेधले लक्ष
मनोरुग्णालयाची पाहणी करीत असताना वॉर्ड क्र. १५ व १६ परिसरातील तुंबलेल्या गटारीकडे आरोग्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. त्यांनी याबाबत जाब विचारत दोन दिवसात तातडीने बांधकाम विभागाकडून दुरुस्ती करून घेण्याचा सूचना केल्या. सोबतच दुरुस्तीचे फोटो पाठविण्याचे निर्देशही दिले.
- कर्मचाऱ्यांची भरती करा
मनोरुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदावर आश्चर्य व्यक्त करीत राजेश टोपे यांनी तातडीने ती भरण्यासाठी आरोग्य विभागाकडे प्रस्ताव पाठविण्याचा, सोबतच औषधांचा तुटवडा जाणार नाही याकडे लक्ष देण्याचा सूचनाही त्यांनी केल्या. यावेळी त्यांच्यासोबत आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पुरुषोत्तम मडावी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी थोरात यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.