जिल्ह्यातील २५० उपकेंद्रातील आरोग्यसेवा ठप्प; महिनाभरापासून कामबंद आंदोलन
By मंगेश व्यवहारे | Published: November 21, 2023 08:33 PM2023-11-21T20:33:06+5:302023-11-21T20:33:16+5:30
ग्रामीण भागातील आरोग्यसेवा सांभाळणारे महिन्याभरापासून संपात : मेयो, मेडिकल, डागावर वाढला डिलेव्हरीचा भार
नागपूर : ग्रामीण भागातील लहान मोठ्या आजाराची काळजी घेणारे, डिलेव्हरी, लसीकरण, बीपी-शुगर तपासणी आणि औषधोपचार करणाऱ्या उपकेंद्राची महिन्याभरापासून सेवा ठप्प पडली आहे. या उपकेंद्राची जबाबदारी सांभाळणारे डॉक्टर, नर्सेसने कामबंद आंदोलन पुकारले असून, महिन्याभरापासून संपात सहभागी आहे. जिल्ह्यात ३१६ उपकेंद्र असून, पैकी २५० उपकेंद्राची सेवा ठप्प पडली आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत ५१ प्राथमिक आरोग्य केंद्र व ३१६ उपकेंद्र कार्यरत आहे. यापैकी ३० टक्के स्टाफ हा कायमस्वरूपी तर ७० टक्के स्टाफ हा कंत्राटी आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी स्टाफमध्ये उपकेंद्रात कंत्राटी समुदायिक आरोग्य अधिकारी (सीएचओ) एक एएनएम कंत्राटी आणि एक एनएनएम कायमस्वरुपी असते. सोबतच एक एमपीएडब्ल्यू हे पद नॉन टेक्निकल असते. गेल्या महिन्याभरापासून या उपकेंद्रातील सीएचओ व एक एएनएम काम बंद करून संपात सहभागी झाले आहे. त्यामुळे कायमस्वरुपी असलेली एक एएनएम व एमपीडब्ल्यू कार्यरत आहे. एका उपकेंद्राला जवळपास ३ ते ५ गावे जोडलेली असतात. उपकेंद्रातून लसीकरण होते व डिलेव्हरी देखील होतात. नियमित ओपीडी काढली जाते आणि औषधे देखील पुरविली जातात. पण उपकेंद्रातील डॉक्टरच सुट्टीवर असल्याने ओपीडी बंद आहे. त्या अनुषंगाने इतरही सेवा बंद आहे. जिल्ह्यात जवळपास १२०० कर्मचारी कंत्राटी असून, हे सर्व संपात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील डिलेव्हरीचा भार शहरातील मेडिकल, मेयो, डागावर पडत आहे.
बाजारगाव उपकेंद्रात ७ डिलेव्हरी महिलांना इतरत्र केले रेफर
बाजारगाव उपकेंद्राच्या एएनएम यांनी सांगितले की महिन्याभरापासून आम्ही संपात असल्याने गावातील ७ महिलांना प्रसुतीसाठी इतरत्र पाठविले. गावातील गरोदर मातांची काळजी व लसीकरणाचे काम ठप्प आहे.
या संपामुळे म्हाताऱ्यांना औषधोपचार नाही, बीपी शुगरची नियमित तपासणी नाही. इमरजेन्सीमध्ये गावकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारे कुणी नाही. उपकेंद्र बंद असल्याने गावकऱ्यांना खाजगी डॉक्टरकडे अथवा शहराकडे धाव घ्यावी लागत आहे- तुषार चौधरी, सरपंच
ग्रामीण भागातील या आरोग्य सेवा बाधित
गरोदर मातांचे एएनसी क्लिनिक बंद आहेत. एएनसी मातांचे व बालकांचे लसीकरण बंद आहे. एचडब्ल्यूसी पोर्टल बंद आहे. ऑनलाईन लसीकरणाची आरसीबी फिडींग बंद आहे. उपकेंद्रात प्रसूती बंद, मूळव्याध सर्जरी बंद आहे. बीपी,शुगर,कॅन्सर तपासणी बंद आहे.
केमोथेरपी बंद आहे. अंगणवाडी व शालेय मुलांची तपासणी बंद. डोळ्यांचे ऑपरेशन बंद. केंद्रीय आयुष्य भव मोहीम रखडली. आशा योजनेचे सर्व पेमेंट थांबले. गरोदर मातांसाठी रक्ताचा पुरवठा प्रभावित. सिकलसेल तपासणी व उपचार बंद आहेत. नवीन कुष्ठरोगी रुंगांची शोध मोहीम व उपचार बंद. क्षयरोग तपासणी बंद. मातांना जननी सुरक्षा योजनेचा लाभ मिळणे बंद. पंतप्रधान मातृवंदन योजनेचा लाभ बंद. नवजात बालकांना गृहभेटी बंद. कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया बंद.
१९९१ पासून आरोग्य विभागात भरती झाली नाही. त्यामुळे सद्या ७० टक्के कंत्राटी व ३० टक्के कायम सेवेतील कर्मचारी आहे. आजच्या घडीला ग्रामीण भागीतील अख्खी आरोग्य यंत्रणा ही कंत्राटीच्या भरोश्यावर आहे. हा कंत्राटील कर्माचारी महिन्याभरापासून कामावर नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील गरीबांचे आरोग्य भगवान भरोसेच आहे. - प्रवीण बोरकर, मार्गदर्शक, राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी समायोजन कृती समिती