आरोग्य व्यवस्था ऑक्सिजनवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:11 AM2021-02-26T04:11:37+5:302021-02-26T04:11:37+5:30

शरद मिरे भिवापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशात रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळणे गरजेचे आहे. मात्र भिवापूर तालुक्यातील ...

Health system on oxygen! | आरोग्य व्यवस्था ऑक्सिजनवर!

आरोग्य व्यवस्था ऑक्सिजनवर!

Next

शरद मिरे

भिवापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशात रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळणे गरजेचे आहे. मात्र भिवापूर तालुक्यातील आरोग्य विभागात तब्बल ५० टक्के पदे रिक्त आहेत. अपुऱ्या मनुष्यबळाअभावी तालुक्यातील संपूर्ण आरोग्य व्यवस्थाच ऑक्सिजनवर आहे.

तालुक्यात सोमनाळा, जवळी व नांद असे तीन प्राथिमक आरोग्य केंद्र असून, त्या अंतर्गत १९ आरोग्य उपकेंद्र आहेत. या केंद्र व उपकेंद्राच्या माध्यमातून तालुक्यातील ११० गावात प्राथमिकस्तरावरील आरोग्य सेवा पुरविली जाते. त्यापुढील उपचारासाठी तालुकास्तरावर भिवापूर येथे ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय अशा तिन्ही ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह अन्य महत्त्वाची पदे रिक्त आहेत. त्यामुळे अपुऱ्या मनुष्यबळात प्रत्येक गावात आरोग्य सेवा कशी पोहचवायची? रुग्णांवर ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार कसे करायचे? असे एक ना अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.

आरोग्य विभागांतर्गत तालुक्यात सहा वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मंजूर असून, त्यापैकी चार पदे रिक्त आहेत. कनिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पाचपैकी एक पद रिक्त आहे. आरोग्य सहायकाचे सहापैकी एक पद रिक्त, आरोग्य सहाय्यिका तीनपैकी दोन पदे रिक्त, आरोग्य सेविका (नियमित) २२ पैकी १५ पदे रिक्त, आरोग्य सेविका (कंत्राटी) १६ पैकी ८ पदे रिक्त, आरोग्य सेवक १९ पैकी ७ पदे रिक्त, औषधनिर्माण अधिकारी पाचपैकी दोन पदे रिक्त, प्रयोगशाळा तंत्रज्ञ तिन्ही पदे रिक्त, वाहन चालक (नियमित) तिन्ही पदे रिक्त, परिचर १७ पैकी ६ पदे रिक्त आहेत. एकंदरीत तालुक्यात आरोग्य विभागांतर्गत विविध १०० पदे मंजूर असताना केवळ ५२ पदे भरलेली आहेत. उर्वरित महत्त्वाची ४८ पदे रिक्त आहेत. तर कंत्राटी पदांमध्ये ३५ पैकी १४ पदे रिक्त आहेत.

कोरोना संसर्ग वाढत असताना त्यावर सर्वस्वी नियंत्रणात्मक महत्त्वाची जबाबदारी आरोग्य विभागावर आहे. येथील डॉक्टरांपासून आरोग्य सेवक व सेविका, परिचर आदी सारेच कर्मचारी ‘कोरोना योद्धा’ म्हणून कार्य करीत आहेत. लोकप्रतिनिधी व समाजसेवी संघटनांनी त्यांचा गौरवही केला. मात्र रिक्त पदांचा ‘बॅकलॉग’ दूर करण्यासाठी लोकप्रतिनिधींकडून प्रयत्न होताना दिसत नाही, ही शोकांतिका आहे.

-

सोमनाळा प्रा.आ. केंद्रात आरोग्याचे ‘वाजले बारा’

भिवापूरपासून अवघ्या ७ कि.मी. अंतरावर सोमनाळा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. त्याअंतर्गत सात उपकेंद्र कार्यरत आहेत. मात्र येथे मनुष्यबळाअभावी आरोग्य व्यवस्थेचे बारा वाजले आहे. आरोग्य सहायकाचे दोनपैकी एक पद रिक्त आहे. आरोग्य सेविका आठपैकी चार पदे रिक्त, आरोग्य सेविका (कंत्राटी) सहापैकी तीन पदे रिक्त, आरोग्य सेवक सातपैकी तीन पदे रिक्त, प्रयोगशाळा तंत्रज्ञ व वाहन चालकाचे प्रत्येकी एकच पद मंजूर असून ते सुद्धा रिक्त आहे. परिचराचे पाचपैकी दोन पदे रिक्त आहेत.

जवळी केंद्रात पूर्णवेळ डाॅक्टर नाही

भिवापूरपासून १५ कि.मी. अंतरावरील जवळी आरोग्य केंद्रांतर्गत सहा आरोग्य उपकेंद्र आहेत. येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांची दोन्ही पदे रिक्त आहेत. कनिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्याचे तीनपैकी एक पद रिक्त आहे. आरोग्य सेविका (नियमित) सातपैकी सहा पदे रिक्त आहेत. आरोग्य सेविका (कंत्राटी) पाचपैकी तीन पदे रिक्त, आरोग्य सेवक सहापैकी दोन पदे रिक्त, प्रयोगशाळा तंत्रज्ञ व वाहन चालकाचे प्रत्येकी मंजूर एक पद तेही रिक्त, परिचर सातपैकी दोन पदे रिक्त आहेत.

स्वच्छता कोण करणार?

तालुक्यात तीन प्राथमिक आरोग्य केंद्र व त्याअंतर्गत १९ उपकेंद्र आहेत. मात्र या ठिकाणची स्वच्छता ठेवण्यासाठी, दैनिक झाडूपोछा लावण्यासाठी सफाई कर्मचाऱ्याचे पदच नाही. त्यामुळे केंद्र व उपकेंद्रातील डॉक्टरांना आपल्या पद्धतीने येथील स्वच्छता सांभाळावी लागते. त्यासाठी गावातीलच एखाद्या व्यक्तीला अल्पशी मजुरी देऊन दैनिक स्वच्छता केली जाते. त्यांचे वेतन कोण कुठून देतात, हे त्यांनाच माहीत.

Web Title: Health system on oxygen!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.