आरोग्य कर्मचाऱ्यांची कोरोना युद्धातून माघार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 12:29 AM2020-09-24T00:29:19+5:302020-09-24T00:31:35+5:30
आरोग्य यंत्रणेत अपुरे मनुष्यबळ असल्याने शासनाने कंत्राटी पद्धतीवर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीला परवानगी दिली. पण कोरोनाच्या भीतीपोटी आरोग्य कर्मचारी युद्धातून माघार घेत आहेत. उमेदवारांचे अर्ज मोठ्या प्रमाणात येत असले तरी, निम्म्यावर लोक रुजूच होत नसल्याचे वास्तव आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आरोग्य यंत्रणेत अपुरे मनुष्यबळ असल्याने शासनाने कंत्राटी पद्धतीवर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीला परवानगी दिली. पण कोरोनाच्या भीतीपोटी आरोग्य कर्मचारी युद्धातून माघार घेत आहेत. उमेदवारांचे अर्ज मोठ्या प्रमाणात येत असले तरी, निम्म्यावर लोक रुजूच होत नसल्याचे वास्तव आहे.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन (एनआरएचएम) कडून ही पदभरती सुरू आहे. अर्ज आल्याबरोबर रुजू होण्याचे ऑर्डरही दिल्या जात आहेत. उमेदवार ऑर्डर घेऊन जातात पण रुजूच होत नाहीत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात १३,३८० बाधित आढळले आहेत. ९,८३५ जणांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. ३५४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागातही वाढत असलेल्या रुग्णांची संख्या लक्षात घेता शासनाने कोविड केअर सेंटर (सीसीसी) उभारून सौम्य किंवा लक्षणे नसलेल्या पण गृह विलगीकरणाची व्यवस्था नसलेल्या पॉझिटिव्ह रुग्णाला तिथे ठेवण्याची व्यवस्था केली आहे. जिल्ह्यात उभारलेल्या १३ केंद्रांमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार करण्यात येत आहे. परंतु आता परिस्थिती फार गंभीर होत असल्याने आरोग्य विभागाकडे मनुष्यबळाचीही चणचण भासत आहे. त्यामुळे शासनाने ‘सीसीसी’साठी आवश्यक डॉक्टर, परिचारिका (नर्स), लॅब टेक्निशियन, औषध निर्माण अधिकारी, डाटा एन्ट्री ऑपरेटर आदी स्टाफ भरण्याची मुभा दिली आहे. त्यांना चांगले मानधनही दिल्या जात आहे. पण कंत्राटी तत्त्वावर कोरोना युद्धात सेवा द्यायला उमेदवार तयार नाहीत. सध्या जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये ३,२३६ वर अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. ४६० रुग्ण सीसीसीमध्ये आहेत. येथे ७०० बेडची व्यवस्था केली असून, कोरोना रुग्णांवर उपचारही करण्यात येत आहेत.
इतकेच झाले रुजू
सीसीसीमध्ये २५ बेडमागे एक डॉक्टर, ६ बेडमागे १ परिचारिकाची गरज आहे. विभागाकडे डॉक्टरसाठी ३५९ लोकांना रुजू होण्याचे आॅर्डरही देण्यात आलेत. परंतु ५० लोकच रुजू झालेत. परिचारिकांमध्ये ६३६ उमेदवारांना ऑर्डर दिले. २२८ रुजू झालेत. १२२ लॅब टेक्निशियन्सना रुजू होण्याचे ऑर्डर दिले. ३८ जण रुजू झालेत. औषण निर्माण अधिकाºयांपैकी ९५ जणांना ऑर्डर देऊनही ४३ जण, तर डाटा एन्ट्री ऑपरेटरच्या १४७ उमेदवारांना ऑर्डर दिले, त्पैकी ५२ रुजू झाले.