मेडिकलमध्ये दारूच्या बॉटल्सचा ढीग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 12:20 AM2019-09-24T00:20:01+5:302019-09-24T00:20:46+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) परिसरात अधिष्ठाता कार्यालयाच्या मागील भागात कचऱ्याच्या टबमध्ये रिकाम्या दारूच्या बॉटल्सचा ढीग आढळून आल्याने खळबळ उडाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शासकीय रुग्णालयात किंवा कार्यालयात मद्यपान करणे हा गुन्हा ठरतो. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) परिसरात मात्र दारूच्या बॉटल्स नेहमीच आढळून येतात. सोमवारी अधिष्ठाता कार्यालयाच्या मागील भागात कचऱ्याच्या टबमध्ये रिकाम्या दारूच्या बॉटल्सचा ढीग आढळून आल्याने खळबळ उडाली. अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी याची गंभीर दखल घेतली आहे.
मेडिकलमध्ये विदर्भासह आजूबाजूच्या राज्यातून रुग्ण येतात. शिवाय रुग्णालयाचा परिसर फार मोठा असल्याने सुरक्षा रक्षकांना सर्वच ठिकाणी लक्ष देणे अशक्य असते. याचा फायदा घेत काही रुग्णांचे नातेवाईक व समाजविघातक रुग्णालयाच्या परिसरात दारू पितात. काही वर्षांपूर्वी वॉर्डाच्या भागात दारूच्या रिकाम्या बॉटल्स सापडल्या. याची चर्चा झाल्याने सफाई कर्मचाऱ्यांनाही याबाबत जाब विचारण्यात आला होता. नंतर मुलांच्या वसतिगृहात दारूच्या बॉटल्स सापडल्यानेही मेडिकल चर्चेत आले होते. आता अधिष्ठाता कक्षाला लागून असलेल्या कार्यालयाच्या मागील परिसरात कचऱ्याच्या टबमध्ये रिकाम्या दारूच्या बॉटल्स आढळून आल्या. विशेष म्हणजे, कचऱ्याच्या टबवर स्वच्छ, सुंदर नागपूरचे स्लोगनही लिहिले आहे. एवढ्या मोठ्या संख्येत दारूच्या बॉटल्स आल्या कुठून, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रकाराला अधिष्ठाता डॉ. मित्रा यांनी गंभीरतेने घेत चौकशीचे आदेश दिले आहे. सफाई कर्मचाºयाने या बॉटल्स जमा केल्या असाव्यात, असा अंदाजही वर्तविण्यात येत आहे.