राष्ट्रीय महिला आयोगापुढे झाली सुनावणी : मुंढे म्हणाले, आरोप निराधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 10:26 PM2020-08-07T22:26:31+5:302020-08-07T22:29:18+5:30
मातृत्व अवकाशापासून वंचित ठेवणे आणि मानसिक त्रास देण्याच्या आरोपासंदर्भात शुक्रवारी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांच्यासमोर व्हर्च्युअल सुनावणी पार पडली. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी त्यांच्यावरील आरोप निराधार असल्याचे सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मातृत्व अवकाशापासून वंचित ठेवणे आणि मानसिक त्रास देण्याच्या आरोपासंदर्भात शुक्रवारी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांच्यासमोर व्हर्च्युअल सुनावणी पार पडली. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी त्यांच्यावरील आरोप निराधार असल्याचे सांगितले. तर पीडिताने नागपूर स्मार्ट अॅण्ड सस्टेनेबल सिटी टेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या कंपनी सेक्रेटरी भानुप्रिया ठाकूर यांनी पुरावे असल्याचा दावा केला.
सूत्रानुसार नवी दिल्ली येथील राष्ट्रीय महिला आयोगाच्या कार्यालयातून रेखा शर्मा यांनी मुंढे आणि ठाकूर यांची बाजू व्हर्च्युअली ऐकून घेतली. यावेळी आयुक्त मुंढे यांनी सांगितले की, त्यांच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप पूर्णपणे निराधार आहेत. तर ठाकूर यांनी सांगितले की, त्यांनी लावलेले आरोप खरे आहेत. त्याचे पुरावेही त्यांच्याजवळ आहेत. महिला आयोगाच्या अध्यक्ष ठाकूर यांनी पुरावे सादर करण्यास सांगितले. पुराव्यांची तपासणी केल्यानंतर महिला आयोग आपला अंतिम निर्णय जाहीर करेल. महिला आयोगाने मुंढे यांच्यावर लागलेल्या आरोपांबाबत राज्य सरकारला अवगत केले आहे.
जून महिन्यात भानुप्रिया ठाकूर यांनी राष्ट्रीय महिला आयोगाकडे लिखित तक्रार केली होती. या तक्रारीत त्यांनी आयुक्त मुंढे यांच्यावर असा आरोप लावला आहे की, आयुक्तांनी जाणीवपूर्वक त्यांना मातृत्व अवकाशापासून वंचित ठेवले. मानसिक त्रास दिला. या तक्रारीच्या आधारावर राष्ट्रीय महिला आयोगातर्फे जुलैच्या शेवटी आयुक्त मुंढे यांना नोटीस जारी करून व्हर्च्युअल सुनावणीदरम्यान आपले म्हणणे सादर करण्यास सांगितले. ठाकूर यांनी स्मार्ट सिटीचे चेअरमन प्रवीण परदेशी यांनाही तक्रारीची प्रत पाठवली होती.