प्रभागात समावेश झाला, पण वस्त्यांची नावेच गायब!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2022 10:43 AM2022-02-22T10:43:39+5:302022-02-22T10:48:53+5:30
महापालिकेच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीचे प्रारूप प्रभाग रचना १ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आली. त्यावर प्राप्त १३२ हरकती व सूचनांवर सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात सुनावणी करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रभागात समावेश आहे; पण निवडणूक विभागाने जाहीर केलेल्या वस्त्यांच्या यादीत नाव नाही. दुसरीकडे काही प्रभागात प्रमुख वस्त्यांच्या नावांचा उल्लेख नाही. दुसरीकडे त्याच भागातील कमी मतदार असलेल्या वस्त्यांचा समावेश करण्यात आल्याचे नगरसेवक, निवडणुकीसाठी इच्छूक व नागरिकांनी सुनावणी दरम्यान आक्षेपाच्या माध्यमातून निवडणूक विभागाच्या निदर्शनास आणले.
महापालिकेच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीचे प्रारूप प्रभाग रचना १ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आली. त्यावर प्राप्त १३२ हरकती व सूचनांवर सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात सुनावणी करण्यात आली. राज्य निवडणूक आयोगातर्फे नियुक्त प्रधान सचिव (वने) बी. वेणुगोपाळ रेड्डी यांनी १०९ हरकती व सूचनांवर सुनावणी घेतली. आक्षेप नोंदविणारे २३ जण सुनावणीसाठी आले नाही. आक्षेपावरील सुनावणी पूर्ण झाली आहे.
सुनावणीला विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगरे-वर्मा, जिल्हाधिकारी आर. विमला, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., अतिरिक्त आयुक्त राम जोशी, निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस, उपायुक्त निर्भय जैन, सहायक आयुक्त (सामान्य प्रशासन) महेश धामेचा तसेच निवडणूक विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
सोमवारी दुपारी १२ वाजता सुरू झालेली सुनावणी सायंकाळी ६.३० वाजता संपली. स्क्रिनवर प्रारूप प्रभाग रचना दाखवून, प्रभागांच्या सीमा व अन्य माहिती दाखवून सुनावणी घेण्यात आली. विविध पक्षाचे नगरसेवक, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, नागरिकांनी हरकती व सूचना दाखल केलेल्या आहेत. २ फेब्रुवारीपर्यंत निवडणूक आयाेगाकडे याबाबतचा अहवाल सादर केला जाणार आहे. प्रभागाचे अंतिम प्रारुप जाहीर झाल्यानंतर आरक्षण काढले जाणार आहे.
मनपा निवडणुकीसाठी एकूण १५६ सदस्यांकरीता ५२ प्रभागाचे प्रारूप नकाशे जाहीर करण्यात आले. जाहीर सर्व ५२ प्रभाग ३ सदस्यांचे आहेत.
गैरसोयीच्या वस्त्यांचा समावेश
प्रभाग ३४ मध्ये गैरसोयीच्या वस्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्या वगळून कामकाजाच्या दृष्टीने सोयीच्या वस्त्यांचा समावेश करण्यात यावा, अशी सूचना राजेश कुंभलकर व मनोज साबळे यांनी केली. असाच आक्षेप शिवसेनेचे शहर अध्यक्ष सिध्देश्वर कोमजवार व दीपक कापसे यांनी प्रभाग ४७ संदर्भात नोंदविला आहे. अधिक लोकसंख्या असलेल्या प्रभागातील भाग बाजुच्या प्रभागाला जोडण्याची मागणी केली. प्रभाग २९ व ४८ यांनी पुनर्रचना करताना शासन निकषाचे पालन केले नसल्याचा आक्षेप नगरसेवक किशोर कुमेरिया यांनी नोंदविला.
परिचित वस्त्यांच्या नावाचा समावेश करा
प्रभाग ३४ मधील रामबाग कॉलनी, रामबाग ले-आऊट अशा परिचित व अधिक लोकसंख्या असलेल्या वस्त्यांची नावे नाही; मात्र कमी लोकसंख्या असलेल्या टाटा कॅपिटलच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे लोकांमध्ये संभ्रम असल्याचा आक्षेप जाॅन थॉमस यांनी नोंदविला आहे. अन्य प्रभागातही असे आक्षेप आहेत.
आक्षेप नोंदविणारे २३ जण अनुपस्थित
प्रभाग रचनेबाबत मनपाकडे १३२ हरकती व सूचना प्राप्त झाल्या होत्या. यात प्रभाग हद्दीबाबत ९९, आरक्षणाबाबत १९, प्रभागामध्ये समाविष्ट असलेल्या वस्त्यांच्या नावाबाबत ०९ व अन्य ०५ सूचनांचा समावेश आहे. यातील १०९ आक्षेपांवर सुनावणी झाली. तर आक्षेप नोंदविणारे २३ जण अनुपस्थित होते.
२८ वस्त्यांपैकी १५ चाच उल्लेख
प्रभाग ४५ मध्ये २८ वस्त्यांचा समावेश आहे; मात्र नकाशात १५ वस्त्यांचा उल्लेख करण्यात आला. उर्वरित १३ वस्त्यांच्या नावांचा समावेश नाही. यात कौसल्या नगर, नाईक नगर, सावित्रीबाई फुले नगर, श्रमजिवी नगर, रमाई नगर, जोशी वाडी, नवीन बाभुळखेडा आदींचा समावेश असल्याचा आक्षेप बसपाचे उत्तम शेवडे यांनी घेतला होता.