नरभक्षक वाघिणीच्या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 12:11 AM2018-09-11T00:11:19+5:302018-09-11T00:12:00+5:30

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा व राळेगाव वन परिक्षेत्रामध्ये वास्तव्यास असलेल्या आणि आतापर्यंत १२ महिला-पुरुषांची शिकार केलेल्या धोकादायक टी-१ वाघिणीला वाचविण्यासाठी वन्यजीवप्रेमी डॉ. जेरिल बनाईत यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेवर मंगळवारी न्यायमूर्तीद्वय मदन लोकुर व दीपक गुप्ता यांच्यासमक्ष सुनावणी होणार आहे. त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Hearing in the Supreme Court today on the man eater tigress case | नरभक्षक वाघिणीच्या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

नरभक्षक वाघिणीच्या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

Next
ठळक मुद्देठार मारण्याच्या आदेशाला आव्हान : वाघिणीने आतापर्यंत केली १२ महिला-पुरुषांची शिकार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा व राळेगाव वन परिक्षेत्रामध्ये वास्तव्यास असलेल्या आणि आतापर्यंत १२ महिला-पुरुषांची शिकार केलेल्या धोकादायक टी-१ वाघिणीला वाचविण्यासाठी वन्यजीवप्रेमी डॉ. जेरिल बनाईत यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेवर मंगळवारी न्यायमूर्तीद्वय मदन लोकुर व दीपक गुप्ता यांच्यासमक्ष सुनावणी होणार आहे. त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
टी-१ वाघिणीला बेशुद्ध करून पकडण्याचे प्रयत्न सुरू ठेवावेत. परंतु, त्यात अपयश आल्यास पुढील मनुष्यहानी टाळण्यासाठी तिला बंदुकीच्या गोळ्या झाडून ठार मारण्यात यावे असा आदेश प्रधान मुख्य वनसंवर्धक (वन्यजीव) ए. के. मिश्रा यांनी गेल्या ४ सप्टेंबर रोजी जारी केला आहे. टी-१ वाघिणीला दोन छावे आहेत. त्या छाव्यांना बेशुद्ध करून पकडावे व बचाव केंद्रामध्ये पाठवावे, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. त्या आदेशाला बनाईत यांनी सुरुवातीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने ६ सप्टेंबर रोजी मिश्रा यांचा आदेश कायम ठेवून त्याविरुद्धची याचिका फेटाळून लावली. हा निर्णय देताना वन विभागाद्वारे सादर प्रभावी पुरावे व मार्गदर्शक तत्त्वातील तरतुदी लक्षात घेण्यात आल्या. हा निर्णय विरोधात गेल्यामुळे बनाईत यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
संबंधित माणसांना या वाघिणीनेच ठार मारले याचे पुरावे वन विभागाकडे नाहीत. वादग्रस्त आदेश जारी करण्यापूर्वी कायद्याचे काटेकोर पालन करण्यात आले नाही. त्यामुळे वनअधिकारी, पोलीस अधिकारी, अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी आदींची उच्चस्तरीय समिती स्थापन करून संबंधित माणसांना कोणत्या प्राण्यांनी ठार मारले याची चौकशी करण्यात यावी व चौकशी अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात यावा असे बनाईत यांचे म्हणणे आहे. वन विभागाच्या दाव्यानुसार, या वाघिणीने आतापर्यंत एकूण १२ महिला-पुरुषांचे बळी घेतले. गेल्या आॅगस्टमध्ये तिने वेडशी येथील गुलाब सदाशिव मोकासे, विहीरगाव येथील वाघू कंधारी राऊत व पिंपळशेंडा येथील नागोराव शिवराम जुनघरे यांना ठार मारले. यापूर्वी वाघिणीला बेशुद्ध करून पकडण्याचा आदेश जारी करण्यात आला होता. दरम्यान, माणसांची शिकार करणे सुरूच असल्यामुळे तिला ठार मारण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. बनाईत यांच्या वतीने अ‍ॅड. तुषार मंडलेकर व अ‍ॅड. रोहण मालविया कामकाज पहात आहेत.

Web Title: Hearing in the Supreme Court today on the man eater tigress case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.