बांगलादेश एअरलाईन्सच्या मुख्य वैमानिकाला हृदयविकाराचा झटका; नागपुरात आकस्मिक लॅण्डिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:11 AM2021-08-28T04:11:31+5:302021-08-28T04:11:31+5:30

नागपूर : मस्कत येथून ढाका जाणाऱ्या बांगलादेश एअरलाईन्स विमानाच्या मुख्य वैमानिकाला शुक्रवारी सकाळी ११ वाजता हृदयविकाराचा झटका आल्याने विमानाचे ...

Heart attack on Bangladesh Airlines chief pilot; Accidental landing at Nagpur | बांगलादेश एअरलाईन्सच्या मुख्य वैमानिकाला हृदयविकाराचा झटका; नागपुरात आकस्मिक लॅण्डिंग

बांगलादेश एअरलाईन्सच्या मुख्य वैमानिकाला हृदयविकाराचा झटका; नागपुरात आकस्मिक लॅण्डिंग

Next

नागपूर : मस्कत येथून ढाका जाणाऱ्या बांगलादेश एअरलाईन्स विमानाच्या मुख्य वैमानिकाला शुक्रवारी सकाळी ११ वाजता हृदयविकाराचा झटका आल्याने विमानाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आकस्मिक लॅण्डिंग करण्यात आले.

नागपूरवरून जाणाऱ्या बांगलादेश एअरलाईन्सचे विमान बीजी-२२ चे मुख्य वैमानिक नौशाद अताउल कयूम यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर सहवैमानिकाने विमानाचे नियंत्रण ताब्यात घेऊन नागपूर एअर ट्रॅफिक कंट्रोलसोबत (एटीसी) संपर्क साधला आणि नागपूर विमानतळावर विमान तातडीने उतरविण्याची परवानगी मागितली. नागपूर एटीसीने वेळेचे महत्त्व समजून तात्काळ आकस्मिक लॅण्डिंगची परवानगी दिली आणि सकाळी ११.२३ वाजता विमानाचे यशस्वीरीत्या लॅण्डिंग करण्यात आले.

यादरम्यान पूर्वीपासून धावपट्टीवर उपस्थित असलेले किंग्सवे हॉस्पिटल्सचे डॉ. मोहम्मद एहतेशामुद्दीन यांनी तातडीने ढाका (बांगलादेश) निवासी ४३ वर्षीय कॅप्टन नौशाद अताउल कयूम यांना बेशुद्ध अवस्थेत विमानातून बाहेर काढले आणि प्राथमिक तपासणीसाठी ॲम्ब्युलन्सने किंग्सवे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. किंग्सवे हॉस्पिटलचे कार्डिओलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. शैलेंद्र गंजेवार म्हणाले, नौशाद अताउल कयूम यांच्यावर आवश्यक उपचार करण्यात आले आहेत. सध्या ते कोमात आहेत.

विमानात १२६ प्रवासी

बांगलादेश एअरलाईन्सचे १६० सीटांचे विमान बोईंग-७३८ असून, त्यामध्ये १२६ प्रवासी होते. सहवैमानिकाने विमान धावपट्टीवर यशस्वीपणे उतरविले. विमानातील सर्व प्रवाशांना उतरवून टर्मिनलमध्ये आणण्यात आले. त्यांना नाश्ता आणि खाद्यपदार्थ देण्यात आले. प्रवाशांची देखरेख एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिस लिमिटेडने केली. प्रवाशांना रात्रीपर्यंत ढाका येथे नेण्यासाठी वैकल्पिक व्यवस्था करण्यात येत होती.

Web Title: Heart attack on Bangladesh Airlines chief pilot; Accidental landing at Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.