विमानात आला हार्ट अटॅक, उपचारासाठी नेताना महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2022 10:00 PM2022-10-01T22:00:18+5:302022-10-01T22:02:03+5:30
Nagpur News शुक्रवारी रात्री दिल्लीवरून बंगळुरूला जात असलेल्या एअर एशियाच्या विमानात एका ज्येष्ठ महिलेला हार्ट अटॅक आला.
नागपूर : शुक्रवारी रात्री दिल्लीवरून बंगळुरूला जात असलेल्या एअर एशियाच्या विमानात एका ज्येष्ठ महिलेला हार्ट अटॅक आला. ती बेशुद्ध झाल्यामुळे विमानाची नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली. या महिलेला उपचारासाठी नेताना तिचा मृत्यू झाला.
विमान क्रमांक ५१७३२ दिल्ली-बंगळुरूमधील प्रवासी एन. नैन्सी थॉमस (वय ६३) यांना श्वास घेण्यात त्रास होत होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवासातच त्यांना हार्ट अटॅक आला आणि त्या बेशुद्ध झाल्या. त्यानंतर विमानाच्या पायलटने त्वरित याची माहिती नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलला देऊन इमर्जन्सी लँडिंगची परवानगी मागितली. त्यानंतर रात्री ११.२७ वाजता हे विमान नागपुरात उतरविण्यात आले.
विमानतळावर किंग्सवे हॉस्पिटलचे डॉ. सुशील चव्हाण यांनी महिलेची तपासणी केल्यानंतर त्यांना रात्री १.४५ वाजता मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु, मेडिकलच्या डॉक्टरांनी रुग्णालयात आणण्यापूर्वीच या महिलेचा मृत्यू झाल्याचे सांगितले. ही महिला बंगळुरूमध्ये शिक्षिका होती. त्यांच्या सोबत त्यांचा विद्यार्थी आणि विद्यार्थिनी दिल्लीला गेले होते. हे दोघे परतीच्या प्रवासात त्यांच्यासोबत येत होते. महिलेस मेडिकलमध्ये नेल्यानंतर विमान बंगळुरूसाठी रवाना झाले. परंतु, शिक्षिकेसोबत दोन्ही विद्यार्थी थांबले होते. ते शनिवारी रात्री ८ वाजताच्या विमानाने बंगळुरूला रवाना झाले.
.............