नागपुरात ‘शहेनशहा’ चा ‘खाकी’सोबत हृद्य संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 12:04 AM2018-12-09T00:04:48+5:302018-12-09T00:12:46+5:30
सदी का महानायक, द स्टार आॅफ द मिलेनियम, बीग बी अशा अनेक नामाभिधानाने गौरवान्वित झालेला भारतीय सिनेसृष्टीचा सुपरस्टार व्यक्तिगत जीवनात किती साधा अन् सहज आहे, ते नागपूरच्या पोलीस अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आज अनुभवले. अवघ्या दहा मिनिटांच्या भेटीत महानायकाने आपल्या विनम्र वर्तनातून लहान मोठ्या सगळ्यांना जिंकले. होय, अमिताभ बच्चन यांनी येथील नागपूरकर पोलीस अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांसोबत आज १० मिनिटे घालवली अन् आपल्याला भारतीय पोलिसांबद्दल नुसता रिलच नव्हे तर रियल जीवनातही आस्था तसेच आदरही असल्याचे दाखवून दिले.
नरेश डोंगरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सदी का महानायक, द स्टार आॅफ द मिलेनियम, बीग बी अशा अनेक नामाभिधानाने गौरवान्वित झालेला भारतीय सिनेसृष्टीचा सुपरस्टार व्यक्तिगत जीवनात किती साधा अन् सहज आहे, ते नागपूरच्या पोलीस अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आज अनुभवले. अवघ्या दहा मिनिटांच्या भेटीत महानायकाने आपल्या विनम्र वर्तनातून लहान मोठ्या सगळ्यांना जिंकले. होय, अमिताभ बच्चन यांनी येथील नागपूरकर पोलीस अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांसोबत आज १० मिनिटे घालवली अन् आपल्याला भारतीय पोलिसांबद्दल नुसता रिलच नव्हे तर रियल जीवनातही आस्था तसेच आदरही असल्याचे दाखवून दिले.
अमिताभ यांनी अनेक शहेनशहा, आखरी रास्ता, परवरीश, खाकी अशा अनेक चित्रपटात पोलीस अधिकाऱ्याची भूमिका वठविली आहे. मात्र, अमिताभ बच्चन या नावाला खऱ्या अर्थाने वलय मिळवून देणारा चित्रपट म्हणजे ‘जंजीर’. या चित्रपटात अमिताभने वठविलेली कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची भूमिका त्याला कमालीची लोकप्रियता देऊन गेली. त्याचमुळे की काय, महानायकाला पोलिसांबद्दल कमालीचा जिव्हाळा असल्याचे सांगितले जाते. येथील पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय मूळचे उत्तर प्रदेशातील अलाहाबादजवळच राहणारे. डॉ. उपाध्याय यांचा मुंबईत जॉर्इंट सीपी ट्रॅफिक असताना अमिताभसोबत नेहमी संपर्क यायचा. आता झुंंड चित्रपटाच्या निमित्तााने अमिताभ नागपुरात शुटिंगला आला असल्यामुळे दोन दिवसांपूर्वी डॉ. उपाध्याय यांच्याशी त्यांची भेट झाली. यावेळी स्वत:हून त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी कौटुंबिक संवाद साधण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार, शनिवारी रात्री ८ वाजताची वेळ निश्चित झाली अन् अत्यंत व्यस्त शेड्युलमधून अमिताभ यांनी वेळ काढला. वर्धा मार्गावरील ज्या हॉटेलमध्ये ते थांबले आहेत, त्या हॉटेलच्या दुसऱ्या माळ्यावरील हॉलमध्ये पोलीस अधिकारी त्यांच्या परिवारासह हजर होते. विशेष सुरक्षा अधिकाऱ्यांच्या गराड्यात महानायक हॉलमध्ये आला अन् येताच अत्यंत शालिनपणे सगळ्यांना आपल्या खास शैलीत नमस्कार केला.
छोट्या-मोठ्या पडद्यावर सुटाबुटात बघितलेला अमिताभ पोलिसांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी मात्र चक्क आकाशी रंगाचा जर्किन अन् गडद निळ्या रंगाचा लोअर घालून आला. पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांनी बुके देऊन त्यांचे स्वागत केले तेव्हा ‘अरे आप सबसे (पोलिसांना) मिल रहा हूं, यही मेरे लिये बहोत हर्ष की बात है, बहोत अच्छा लगता है, आपसे (पोलिसांसोबत) मिलकर, असे म्हणत अमिताभने आपुलकी जाहीर केली.
त्यानंतर, प्रत्येकाजवळ जाऊन कैसे हो, असे तो विचारत होता. चिमुकल्याचा गाल पकडत होता तर, पाया पडायला आलेल्या छोट्या मुलांना ‘अरे रहेने दो’ म्हणत त्यांच्या डोक्यावर हात ठेवत होता. आॅटोग्राफ घेण्यासाठी लहानग्यांची झुंबड उडाल्याचे पाहून ‘अरे रुको... सब को देता हूं’असे म्हणत त्यांनी सगळ्यांना आश्वस्त केले. केवळ अधिकारी अन् त्यांच्या कुटुंबीयांसोबतच नव्हे तर बंदोबस्ताच्या निमित्ताने आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनादेखील ‘आओ, आप भी आओ’ म्हणत स्वत:जवळ बोलविले आणि त्यांच्यासोबत फोटो काढून घेतले. महानायक असण्याचा कुठलाही आविर्भाव या हृद्यसंवादात नव्हता. पोलीस अधिकारी म्हणून अनेक चित्रपटात भूमिका वठविताना खाकी वर्दीमधला माणूस जाणणारा हा एवढ्या उंचीचा अभिनेता एका सामान्य माणसासारखाच हसला, बोलला आणि वावरला. त्याचे वर्तन भारावून टाकणारेच होते.
मधुशाला बघून हसला
डीसीपी हर्ष पोद्दार यांनी अमिताभला हरिवंशराय बच्चन यांचा मधुशाला हा कवितासंग्रह भेट दिला. तो बघून अमिताभ हसला. ओ... ये बहोत अच्छा है... असे म्हणत डीसीपी पोद्दार यांना धन्यवाद दिले. यावेळी लोकतमच्या प्रस्तुत प्रतिनिधीने त्यांना आपली ओळख लोकमतचे क्राईम रिपोर्टर आहो, अशी देताच हस्तांदोलन करून त्यांनी ‘लोकमत ... बहोत अच्छे... ग्रेट जॉब... असे म्हणत आपल्या विशिष्ट शैलीत मुस्कुराहट बिखेरली.