‘ये दिल मांगे मोअर’
By admin | Published: September 30, 2016 03:19 AM2016-09-30T03:19:24+5:302016-09-30T03:19:24+5:30
पठाणकोट, उरी येथे घडलेल्या घटनेनंतर नागरिकांसोबतच माजी सैनिकांमध्ये एक रोष होता.
सेनेच्या कारवाईचे माजी सैनिकांकडून स्वागत : पाकिस्तानला वठणीवर आणण्यासाठी ठोस कारवाईच आवश्यक
नागपूर : पठाणकोट, उरी येथे घडलेल्या घटनेनंतर नागरिकांसोबतच माजी सैनिकांमध्ये एक रोष होता. बुधवारी मध्यरात्री सेनेने ‘सर्जिकल स्ट्राईक’ करून पठाणकोट आणि उरी हल्ल्याचा बदला घेतला आहे. पाकिस्तानला दिलेला एक मोठा झटका आहे. कदाचित याचा परिणाम युद्धात होऊ शकतो. त्यासाठीही आपले सैन्य तयार आहे. सरकारकडून मिळत असलेल्या प्रतिसादामुळे सैन्यामध्ये जोश आहे. संपूर्ण देशवासीयांचेही सेनेला पाठबळ आहे. भारत पाकिस्तानला नक्कीच धूळ चारणार अशी भावना माजी सैन्य अधिकारी व सैनिकांनी व्यक्त केली आहे.
माजी सैनिक संघटनांच्या प्रतिनिधींनी भारतीय सेनेच्या कारवाईमुळे आमच्यात उत्साह संचारला असल्याचे सांगत, ‘खुन से खेलेंगे होली, अगर वतन मुश्किल में है, सरफरोशी की तमन्ना, अब भी हमारे दिल में है’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. कारगील युद्धाच्या वेळी शहीद विक्रम बत्रा यांनी ‘ये दिल मांगे मोअर’ असा देशभराला संदेश दिला होता. पाकिस्तानला आता वठणीवर आणण्यासाठी अशाच आणखी कारवायांची आवश्यकता असल्याचे मत माजी सैनिकांनी व्यक्त केले.
पंतप्रधानांचे कौतुक
पाकिस्तानविरोधात पहिल्यांदाच ‘सर्जिकल स्ट्राईक’ करण्याचा धाडसी निर्णय घेतल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र शासनाचेदेखील यावेळी माजी सैनिकांनी कौतुक केले. उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर लगेच कारवाई योग्य ठरली नसती. मोदी यांनी अगोदर कूटनीती वापरत पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर एकटे पाडले व योग्य वेळ साधून हा हल्ला केला. यामुळे सैन्याचे मनोबलदेखील वाढले असल्याचे माजी सैनिकांनी सांगितले.
उरी हल्ल्यातील
शहिदांना श्रद्धांजली
वारंवार होत असलेल्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात भारतीय सैनिक शहीद होत होते. सेनेमध्ये पाकिस्तानविरोधात एक खदखद निर्माण झाली होती. अशात उरी येथे झालेल्या हल्ल्यात १७ जवान शहीद झाले. अनेक जवान जखमी झाले. त्यामुळे जवानांचा असंतोष अधिकच वाढला होता. त्यामुळे सरकार आणि सेनेकडून अशा कारवाईची अपेक्षा होती. देशाच्या संसदेवर झालेल्या हल्ल्यानंतर असा अटॅक अपेक्षित होता. त्यावेळीही सेनेत जोश होता. पाकिस्तानच्या बॉर्डरवर आम्ही सज्ज होतो. परंतु सरकारचा आदेश नव्हता. त्यानंतर पठाणकोटचा हल्ला आता उरीचा यामुळे सैनिकांचे मनोबल ढासळले होते. सरकारने योग्य निर्णय घेत सर्जिकल आॅपरेशन राबवून सेनेचे मनोबल वाढविले आहे. सोबतच उरी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
-सिद्धार्थ मंडपे, माजी सैनिक
पाकिस्तानवर
दबाव निर्माण होईल.
सर्जिकल आॅपरेशन हे युद्ध नाही, तर देशाच्या सीमेवर देशविरोधी दिसून आलेल्या घडामोडीवर हल्ला करून सीमेचे संरक्षण करण्याकरिता उचललेले पाऊल आहे. एलओसीवर होणारी ही प्रक्रिया नियमित आहे. यातून पाकिस्तानला धडा घ्यावा लागेल. कारण पाकिस्तानची युद्ध करायची ताकद नाही. छुपे हल्ले करून तो देशाची आंतरिक सुरक्षा धोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत होता. या हल्ल्यामुळे पाकिस्तानवर दबाव निर्माण होईल. सरकारने पहिल्यांदा सेनेला निर्णय घेण्याचे स्वातंत्र दिल्यामुळे सेनेला हे शक्य झाले आहे. देशाने एक साहसी पाऊल उचलले आहे.
-निलकंठ व्यास, माजी सैनिक
पाकिस्तानला समजेल असेच प्रत्युत्तर
भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिरून केलेला सर्जिकल हल्ला स्वागतार्हच आहे. यामुळे देशभरात आनंदाचे वातावरण आहे. उरी येथे भारतीय सैन्याच्या शिबिरावर झालेल्या हल्ल्यानंतर या पावलाचीच गरज होती. यामुळे पाकिस्तानला दणका बसला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाकिस्तानला समजेल अशाच भाषेत भारतीय जवानांनी प्रत्युत्तर दिले आहे. गेल्या ७० वर्षातील पाकिस्तानवर केलेला हा पहिला अशा प्रकारचा हल्ला आहे.
-कर्नल (निवृत्त)अभय पटवर्धन
सैनिकांसाठी देशाने एकत्र यावे
भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिरून जो पराक्रम दाखविला आहे, ते कौतुकास्पद आहे. देशातील आजी-माजी सैन्य अधिकारी-जवान, नागरिक यांना प्रचंड आनंद झाला आहे. देश या पावलाची प्रतीक्षा करत होता. परंतु उरी येथील हल्ल्यानंतर लगेच प्रत्युत्तर देणे योग्य ठरले नसते. केंद्र शासनाने अगोदर आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची कोंडी केली. त्यानंतर योग्य नियोजन करून हे आॅपरेशन पार पाडले. या हल्ल्यामुळे सीमेवर निश्चितच तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. युद्धाची ठिणगी कधीपण पेटू शकते. अशा परिस्थितीत सर्व राजकीय विरोध विसरून सर्व पक्षांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. सीमेवर लढणाऱ्या सैनिकांचे मनोबल उंचावेल यासाठी संपूर्ण देश एक झाला पाहिजे. पाकिस्तान यावर शांत राहणार नाही. परंतु धमक्या देण्यापलीकडे आजच्या तारखेत हा देश काहीही करू शकत नाही. आजचा दिवस सर्व जवानांसाठी अभिमानाचाच दिवस आहे.
-कर्नल (निवृत्त)सुनील देशपांडे