हृदय : शरीरातील सर्वात उपेक्षित घटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:06 AM2021-06-06T04:06:47+5:302021-06-06T04:06:47+5:30
प्र. विडो मेकर हार्ट अटॅकची लक्षणे काय? छातीमध्ये वेदना होणे, प्रसंगी असहाय वेदना होणे हे प्रारंभिक लक्षण असते. शरीराच्या ...
प्र. विडो मेकर हार्ट अटॅकची लक्षणे काय?
छातीमध्ये वेदना होणे, प्रसंगी असहाय वेदना होणे हे प्रारंभिक लक्षण असते. शरीराच्या वरील भागावर होणाऱ्या या वेदना दोन्ही भुजा आणि पाठीपर्यंत पोहोचतात. मान, जबडा, पोटावरील भागावरही वेदना जाणवतात. काही व्यक्तींमध्ये छातीमध्ये वेदना होण्यासोबतच श्वास घेण्यास अडचण जाणवते. अधिक प्रमाणात घाम सुटणे, डोके गरगरणे, मळमळणे, पाठ किंवा जबडा तसेच काखेमध्ये आणि भुजांमध्ये अधिक प्रमाणात वेदना होणे हेसुद्धा घातक हार्ट अटॅकचे प्रारंभिक लक्षण असते.
प्र. विडो मेकर हार्ट अटॅक का येतो ?
हृदयाच्या मांसपेशींना सातत्याने ऊर्जेचा पुरवठा आवश्यक असतो. ही ऊर्जा रक्तामधून मिळते. रक्तपुरवठा थांबतो, तेव्हा हार्ट अटॅक येतो. ऑक्सिजन हृदयापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे काही मिनिटातच मांसपेशी मृत होण्यास सुरुवात होते. जेव्हा डाव्या बाजूची मुख्य आर्टरी किंवा एलएडीमध्ये मोठा ब्लॉकेज बनतो, तेव्हा विडो मेकर हार्ट अटॅक येतो. हृदयाला रक्तपुरवठा करणारी आर्टरीज ही मोठा स्रोत असते. महत्त्वपूर्ण जागेवर होणारा रक्तपुरवठा पूर्णत: बंद पडताच विडो मेकर हार्ट अटॅक येतो.
प्र. विडो मेकर हार्ट अटॅकची कारणे?
हा सामान्य हार्ट अटॅकसारखाच असतो. यात हायपरटेन्शन, डायबिटीज, हाय कोलेस्ट्रॉल, शारीरिक हालचाल कमी असणे, धूम्रपान, भावनात्मक तणाव, लठ्ठपणा कारणीभूत असतो. एखाद्या जवळच्या नातेवाइकाला कमी वयात हार्ट अटॅक आल्यास धोका वाढतो.
प्र. महिलांवर याचा परिणाम पडतो का?
याचे नाव विडो मेकर हार्ट अटॅक असले तरी महिलांसाठीही तो तेवढाच धोकादायक असतो. लक्षण कमी अधिक असू शकतात. त्यांना हलक्या लक्षणांनंतरसुद्धा गंभीर हार्ट अटॅक येऊ शकतो. यामुळे उपचारात विलंब होण्याचा प्रकार घडतो.
प्र. महिलांमध्ये हार्ट अटॅकची काय लक्षणे आहेत?
पुरुषांप्रमाणेच छातीमध्ये वेदना आणि घाम सुटण्यासोबत महिलांमध्ये थकवा आलेला आणि श्वास फुललेला अशी लक्षणे दिसतात. काहींना उलटी होऊ शकते किंवा पोटाच्या वरील भागात वेदना होऊ शकतात. डोकेदुखी असहाय होते. थंड घाम सुटतो. श्वास उखडणे, मळमळ होणे, पोटाच्या वरील भागात वेदना, पाठदुखी, तसेच जबड्यात वेदना हे प्रमुख लक्षण आहे.
प्र. विडो मेकर हार्ट अटॅक कसा समजावा?
मुख्य निदान तर ईसीजी आणि कोरोनरी एन्जियोग्राममधूनच होऊ शकते. ईसीजीमध्ये इन्टिरियर लीड्समध्ये एसटी सेगमेंटचे एलिवेशन दिसते. याला एसटी एलिवेशन मायोकार्डियर इन्फार्केशन किंवा स्टेमी असे म्हणतात. एन्जियोग्राम एलएडीमध्ये ब्लॉकेज शंभर टक्के दिसतात. हृदयाच्या मांसपेशींचा जेवढा भाग प्रभावित होईल, तेवढाच हृदयरोग गंभीर होतो.
प्र. असा हार्ट अटॅक आल्यास काय करावे?
सर्व सुविधा उपलब्ध असणाऱ्या रुग्णालयात अशा रुग्णाला तत्काळ न्यायला हवे. ऑक्सिजन, ब्लड थिनर्स, थ्रोम्बोलिटिक एजेन्ट्स तातडीने द्यावे. हार्ट अटॅक आल्याच्या सहा तासांच्या आत थ्रोमोबोलिटिक थेरेपी अत्यंत उपयोगाची ठरते. या उपचारपद्धतीमुळे रक्ताच्या गुठळ्या नाहीशा होतात आणि हृदयाच्या पेशींना रक्तपुरवठा विनाअडथळा सुरू होतो. हा उपचार तातडीने मिळाला तर हृदयाच्या मांसपेशीमधील फायबरचे मृत पावणे थांबते.
प्र. एन्जिओप्लास्टीचे लाभ?
थ्रोम्बोलिटिक थेरेपीच्या काही मर्यादा आहेत. एलएडीमध्ये झालेले आकुंचन (आर्टरी)ला बलूनच्या माध्यमातून मोठे करून किंवा स्टेंट टाकून दूर केले जाऊ शकते. हे थ्रोम्बोलिटिक थेरेपीपेक्षा अधिक प्रभावी असते. याला प्रायमरी एन्जिओप्लास्टी म्हणतात. उत्तम परिणामासाठी हा उपचार छातीमध्ये वेदना किंवा हार्ट अटॅक येऊन गेल्याच्या तीन तासात करायला हवा. यासाठी तातडीने रुग्णालयात नेऊन एन्जिओप्लास्टी करणे महत्त्वाचे असते. जेवढ्या लवकर हृदयाला रक्तपुरवठा होईल, तेवढी अधिक रुग्ण वाचण्याची शाश्वती असते.