नागपूरच्या मेडिकलमधून गेले हृदय चेन्नईला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 10:32 PM2017-12-13T22:32:15+5:302017-12-13T22:39:11+5:30
नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) एका ‘ब्रेन डेड’ व्यक्तीकडून मिळालेले हृदय चेन्नई येथे तर यकृत पुण्यातील एका रुग्णाला देण्यात आले.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) एका ‘ब्रेन डेड’ व्यक्तीकडून मिळालेले हृदय चेन्नई येथे तर यकृत पुण्यातील एका रुग्णाला देण्यात आले. शासकीय रुग्णालयातील हा पहिलचा प्रयोग असल्याचे बोलले जात आहे. ‘ब्रेन डेड’ व्यक्तीच्या नातेवाईकांच्या मानवतावादी भूमिकेमुळ दोघांना जीवनदान तर दोघांना दृष्टी मिळाली.
सुभाष पुरी (५७) रा. नागपूर असे अवयवदात्याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, २३ नोव्हेंबर रोजी कोंढाळी जवळ सुभाष पुरी यांचा भीषण अपघात झाला. त्यांना तत्काळ धंतोली येथील न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु उपचारानंतरही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. हॉस्पिटलच्या विशेष डॉक्टरांच्या चमूने तपासल्यावर मेंदू मृत (ब्रेन डेड) घोषित केले. डॉक्टरांनी त्यांचा मुलगा स्वप्निलसह जवळच्या नातेवाईकांना अवयवदानाचा सल्ला दिला. त्या दु:खातही त्यांनी अवयवदानाला मंजुरी दिली. सुभाष पुरी यांना मेडिकलच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये हलविण्यात आले. येथे न्यूरोसर्जन डॉ. प्रमोद गिरी, औषधवैद्यकशास्त्रतज्ज्ञ डॉ. वृंदा सहस्रभोजनी, बधिरीकरणतज्ज्ञ डॉ. नरेश तिरपुडे व डॉ. पी. पटनाईक यांनी पुन्हा तपासणी करून ‘ब्रेन डेड’ घोषित केले. याची माहिती विभागीय प्रत्यारोपण समितीचे (झेडटीसीसी) अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी व सचिव डॉ. रवी वानखेडे यांना देण्यात आली. त्यांनी ‘टिश्यू ट्रान्सप्लांट आॅर्गनायझेशन’ (सोटो) याची माहिती दिली. त्यानुसार यकृत सह्याद्री हॉस्पिटलच्या एका रुग्णाला देण्याचे ठरले. परंतु हृदयसाठी संबंधित रुग्णालय समोर येत नसल्याचे पाहत ‘आॅर्गन टिश्यू आॅर्गनायझेशन’ (रोटो) यांना कळविण्यात आले. त्यांनी घेतलेल्या निर्णयानंतर हृदय चेन्नई येथील ‘फोर्टीस मलार हॉस्पिटल’ येथील एका रुग्णाला देण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी या दोन्ही रुग्णालयाच्या डॉक्टरांची चमू उपस्थित होती. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी पुढाकार घेतल्याने शासकीय रुग्णालयात पहिल्या ब्रेन डेड व्यक्तीचे अवयवदान होऊ शकले.
दोन वेळा झाले ग्रीन कॉरिडोअर
ग्रीन कॉरिडोअरच्यामदतीने मेडिकल येथून सकाळी ९.३० वाजता ‘हृदय’ तर १०.४५ वाजता ‘यकृत’ नागपूर विमानतळावर पाठविण्यात आले. दोन अवयवासाठी दोनवेळा ‘ग्रीन कॉरिडोअर’ करण्यात आले. पोलीस उपायुक्त (वाहतूक) रवींद्र परदेसी यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयेश भांडारकर व श्याम सोनटक्के यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले. विमानतळ येथून हे अवयव विशेष विमानाने संबंधित हॉस्पिटलमध्ये दाखल झाले.