उपराजधानीचे ‘हृदय’ राजधानीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 12:46 AM2017-10-31T00:46:10+5:302017-10-31T00:48:08+5:30

आंतराज्यस्तरावर सोमवारी पहिल्यांदाच हृदय प्रत्यारोपण झाले.

The 'heart' of the sub-capital 'in the capital' | उपराजधानीचे ‘हृदय’ राजधानीत

उपराजधानीचे ‘हृदय’ राजधानीत

Next
ठळक मुद्देपहिल्यांदाच आंतरराज्यस्तरावर हृदय प्रत्यारोपणअवस्थी कुटुंबीयांच्या पुढाकारामुळे दोघांना जीवनदान

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आंतराज्यस्तरावर सोमवारी पहिल्यांदाच हृदय प्रत्यारोपण झाले. मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्यामुळे ब्रेन डेड झालेले नागपूर रहिवासी अमित अवस्थी (४०) यांचे हृदय राजधानी दिल्ली येथे नेण्यात आले. अवस्थी कुटुंबीयांनी वेळीच अवयव दानाचा निर्णय घेतल्याने दोघांना जीवनदान तर दोघांना दृष्टी मिळू शकली.
हॉटेल व्यावसायिक अमित अवस्थी यांना उच्च रक्तदाबामुळे मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाला. त्यांना धंतोली येथील न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. परंतु येथे उपचारानंतर डॉक्टरांनी अवस्थी यांना ब्रेनडेड घोषित केले. अवस्थी कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. या स्थितीतही अमित अवस्थी यांचे वडील विनोदकुमार अवस्थी व इतर कुटुंबीयांनी एकत्र येऊन अवयवदानाचा निर्णय घेतला. विभागीय प्रत्यारोपण समितीचे सचिव डॉ. रवी वानखेडे यांनी अवयवदानासाठी पुढील प्रक्रियेला गती दिली.
त्यानुसार २९ आॅक्टोबर रोजी शंकरनगर येथील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये अमित अवस्थी यांना दाखल करण्यात आले.
सोमवार ३० आॅक्टोबर रोजी सकाळी ८.३० वाजता अवयव काढण्याच्या शस्त्रक्रियेला सुरुवात झाली. वोक्हार्टचे सीव्हीटीएस सर्जन डॉ. समीर पाठक, नवी दिल्ली एम्सचे सीव्हीटीएस सर्जन डॉ. मिलिंद होटे, डॉ. अवंतिका जयस्वाल यांनी यशस्वीरीत्या हृदय काढले. वोक्हार्टचे ‘मल्टि आॅर्गन ट्रान्सप्लांट सर्जन’ डॉ. अनुराग श्रीमल तर पुणे येथील यकृत प्रत्यारोपण सर्जन डॉ. नरुटे यांच्याकडे हृदय व यकृत सोपविण्यात आले. त्वचा डॉ. समीर जहागीरदार यांनी रोटरी स्किन बँकेत पाठवली तर नेत्रपटल (कॉर्निआ) माधवनगर नेत्र पेढीला देण्यात आले.
३ मिनिटे २० सेकंदात गाठले विमानतळ
सोमवारी दुपारी १२ वाजता अवयव काढण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. त्यानंतर हृदय व यकृत ग्रीन कॉरिडोअरच्यामदतीने अवघ्या ३ मिनिटे २० सेकंदात विमानतळावर पोहचविण्यात आले. येथून विशेष विमानाने हृदय नवी दिल्ली येथे ‘एम्स’ तर यकृत पुण्याच्या एका रुग्णालयात नेण्यात आले. वोक्हार्ट हॉस्पिटलच्या सेंटर हेड के. सुजाथा म्हणाल्या, अवस्थी कुटुंबीयांच्या वेळीच घेतलेल्या निर्णयामुळे दोन व्यक्तींना जीवनदान मिळू शकले.
२४ वे ‘कॅडेव्हर डोनर’
डॉ. रवी वानखेडे म्हणाले, मेंदू मृत व्यक्तीकडून (कॅडेव्हर डोनर) अवयव मिळालेली ही २४ वी घटना आहे. अवयवदान जनजागृतीमुळेच आतापर्यंत नागपूर व वर्धा मिळून तीन हृदय व इतर अवयव नागपूरबाहेर पाठविणे शक्य झाले. सोमवारी पहिल्यांदाच आंतरराज्यस्तरावर हृदय पाठविण्यात आले. विशेष म्हणजे, अवयवदानाविषयी वाढत्या जनजागृतीचा प्रभाव आता दिसून येत आहे. यावर्षी नऊ मेंदू मृत (ब्रेन डेड) व्यक्तींचे अवयव दान झाले. आतापर्यंतचा वर्षभरातील आकडेवारीत हा सर्वात मोठा आकडा आहे.

Web Title: The 'heart' of the sub-capital 'in the capital'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.