हृदय शस्त्रक्रिया बंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:08 AM2021-09-13T04:08:14+5:302021-09-13T04:08:14+5:30
नागपूर : हृदयावरील उपचारात वरदान ठरलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील हृदयरोग विभागातील कॅथलॅब आठवडा होऊनही बंदच आहे. अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी ...
नागपूर : हृदयावरील उपचारात वरदान ठरलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील हृदयरोग विभागातील कॅथलॅब आठवडा होऊनही बंदच आहे. अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी रखडल्याने हृदय शस्त्रक्रियाही बंद पडल्याने गरीब रुग्ण अडचणीत सापडले आहेत.
विप्रो जे.ई. हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेडकडून १४ ऑगस्ट २०१२ रोजी ‘विप्रो जीई-कॅथलॅब’ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये स्थापन झाली. या यंत्रावर दिवसभरात १० ते १२ अँजिओग्राफी, तर ४-५ अँजिओप्लास्टी होत होत्या. हे यंत्र आजही विप्रो जे.ई. कंपनीच्या ‘वॉरंटी’मध्ये येते. तसा करार झालेला आहे. ६ सप्टेंबर रोजी अचानक कॅथलॅब बंद पडल्याने कंपनीला याची माहिती देण्यात आली; परंतु २०१८-१९ चा थकीत असलेले जवळपास २८ लाख रुपयांचा निधी मिळत नाही तोपर्यंत दुरुस्ती करण्यास कंपनीने नकार दिल्याचे समजते. यामुळे आठवडा होऊनही यंत्राची दुरुस्ती झाली नाही.
-६० अँजिओग्राफी, तर २४ अँजिओप्लास्टी रखडल्या
‘सुपर’ची कॅथलॅब आठवडा होऊनही बंद असल्याने ६० अँजिओग्राफी, तर २४ अँजिओप्लास्टी रखडल्या आहेत. हे यंत्र कधी सुरू होईल याची शाश्वती कोणी अधिकारी देत नसल्याने अँजिओग्राफी किंवा अँजिओप्लास्टीच्या प्रतीक्षेत असलेले रुग्ण स्वत:हून रुग्णालयातून सुटी घेऊन जात असल्याची माहिती आहे. यातील काही रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. यामुळे ते पुढील उपचार घेतील की नाही, हा प्रश्न आहे.
-खर्चाचा प्रस्ताव मंत्रालयात
२०१८-१९ चा कॅथलॅब दुरुस्ती खर्चाचा प्रस्ताव मंत्रालयात पाठविण्यात आला आहे. त्यांच्याकडून लवकरच याला मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे; परंतु त्यापूर्वी कॅथलॅब सुरू करण्याचा प्रयत्न आहे.
-डॉ. सुधीर गुप्ता, अधिष्ठाता, मेडिकल