नागपुरात १० दिवसांपासून थांबल्या हृदय शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 11:46 AM2019-08-19T11:46:27+5:302019-08-19T11:46:59+5:30
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या हृदय शल्यचिकित्सा विभागातील ‘अॅटो ब्लड गॅस अॅनालायझर’ (एबीजी) हे जुने यंत्र पुन्हा बंद पडल्याने शस्त्रक्रिया ठप्प पडल्या आहेत. गेल्या १० दिवसांपासून रुग्ण शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत असून, गंभीर रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या हृदय शल्यचिकित्सा विभागात (सीव्हीटीएस) कधी नव्हे अशा गुंतागुंतीच्या व गंभीर शस्त्रक्रिया होऊ घातल्या आहेत. हृदय शस्त्रक्रियांची संख्याही वाढली आहे. यामुळे विदर्भच नाही तर आजूबाजूच्या चार राज्यातून रुग्णांचा ओघ वाढला आहे. परंतु येथील जुनाट यंत्रसामुग्रीचा फटका रुग्णांना बसत आहे. या विभागातील ‘अॅटो ब्लड गॅस अॅनालायझर’ (एबीजी) हे जुने यंत्र पुन्हा बंद पडल्याने शस्त्रक्रिया ठप्प पडल्या आहेत. गेल्या १० दिवसांपासून रुग्ण शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत असून, गंभीर रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे.
मेडिकलशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या ‘सीव्हीटीएस’ विभागाची जबाबदारी विभागप्रमुख व प्रसिद्ध हृदय शल्यचिकित्सक डॉ. निकुंज पवार यांच्याकडे येताच, त्यांनी हृदय शस्त्रक्रियेची संख्या वाढविली. विशेष म्हणजे, हृदय बंद पाडून, ४० मिनिटे रक्तभिसरण थांबवून महाधमनीवर अत्यंत गुंतागुंतीची असलेली ‘अॅरोटिक असेन्डिंग डिसेक्शन’ यासारख्या गंभीर शस्त्रक्रियाही सुरू केल्या. परिणामी, कमी दिवसातच सीव्हीटीएस विभागात रुग्णांची गर्दी वाढली. जून २०१९ पर्यंत ३६३ हृदय शस्त्रक्रिया डॉ. पवार यांच्या नेतृत्वात झाल्या. शस्त्रक्रियेचा ओघ वाढत असताना जुने तंत्रज्ञान अडथळा आणत आहे. ‘सीव्हीटीएस’ विभागात गेल्या अनेक वर्षांपूर्वी असलेले जुनाट ‘एबीजी’ यंत्र गेल्या एक-दोन वर्षांपासून वारंवार नादुरुस्त राहते. यंत्राच्या दुरुस्तीवर हजारो रुपये खर्च होत आहे. या यंत्राशिवाय हृदय शस्त्रक्रिया करताच येत नाही. त्यामुळे गेल्या १० दिवसांपासून शस्त्रक्रिया बंद पडल्या आहेत. रोज या विभागात दोन शस्त्रक्रिया होत असल्याने व गंभीर रुग्णांना प्राधान्य दिले जात असल्याने रुग्णांची प्रतीक्षा यादी वाढली आहे.
सूत्रानुसार, अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी याची गंभीर दखल घेत तातडीने यंत्र दुरुस्तीचे आदेश दिले. दोन दिवसांपूर्वी यंत्र दुरुस्ती करण्यात आली. परंतु दुसऱ्याच दिवशी पुन्हा यंत्र नादुरुस्त झाले. सीव्हीटीएस विभागाने काही महिन्यांपूर्वी नव्या ‘एबीजी’ यंत्राचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता.
परंतु अद्यापही यंत्र उपलब्ध झाले नाही. शस्त्रक्रियाच होत नसल्याने कुण्या रुग्णाचा जीव गेल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नव्या यंत्रासाठी पैठणकर यांचा पुढाकार
नागपूरच्या मेडिकलमधून वैद्यकीय शिक्षण घेतलेले दुबई येथील ‘राईट हेल्थ ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक’ डॉ. संजय पैठणकर यांनी अलीकडेच सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला भेट दिली. नादुरुस्त ‘एबीजी’ यंत्रामुळे हृदय शस्त्रक्रिया बंद पडल्याचे सांगितल्यावर त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. त्यांनी तातडीने अधिष्ठात्यांची भेट घेत यंत्र खरेदीसाठी निधी देण्याचे आश्वासन दिल्याचे समजते.