आता नागपुरातही हृदय प्रत्याराेपणाची व्यवस्था ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:11 AM2021-08-29T04:11:59+5:302021-08-29T04:11:59+5:30
नागपूर : मध्य भारतातील मेडिकल हब म्हणून प्रसिद्ध असलेल्या नागपूर शहरातील सुभाषनगरस्थित विवेका सुपरस्पेशालिटी हाॅस्पिटल व रिसर्च सेंटर येथे ...
नागपूर : मध्य भारतातील मेडिकल हब म्हणून प्रसिद्ध असलेल्या नागपूर शहरातील सुभाषनगरस्थित विवेका सुपरस्पेशालिटी हाॅस्पिटल व रिसर्च सेंटर येथे हृदय प्रत्याराेपणाची व्यवस्था करण्यात आली आहे. शनिवारी केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते रुग्णालयाच्या हार्ट फेल्युअर क्लिनिक व हार्ट ट्रान्सप्लॅन्ट प्राेग्रॅमचे उद्घाटन करण्यात आले.
एमजीएम हेल्थकेअर चेन्नई यांच्या सहकार्याने विवेका हाॅस्पिटलमध्ये या अत्याधुनिक युनिटची सुरुवात करण्यात आली आहे. उद्घाटनप्रसंगी एमजीएम चेन्नईच्या हृदय व फुप्फुस प्रत्याराेपण विभागाचे संचालक डाॅ. के. आर. बालकृष्णन, सहसंचालक डाॅ. के. जी. सुरेश राव, कार्डिओलाॅजी व हार्ट फेल्युअर प्राेग्रॅमचे वरिष्ठ सल्लागार डाॅ. आर. रविकुमार तसेच विवेका हाॅस्पिटलचे वरिष्ठ सल्लागार हृदयराेगतज्ज्ञ डाॅ. प्रशांत जगताप, हृदय शल्य चिकित्सक डाॅ. के. जी. जयप्रसन्न आदी प्रामुख्याने उपस्थित हाेते. विवेका हाॅस्पिटल हे १०० बेडचे अत्याधुनिक रुग्णालय असून, यात २० बेडचे आयसीयू, १० बेडचे एसआयसीयू व ५ ऑपरेशन थिएटर आहेत. हाॅस्पिटलमध्ये किडनी प्रत्याराेपणाचीही व्यवस्था आहे. नव्याने सुरू झालेल्या हार्ट फेल्युअर क्लिनिक व हार्ट ट्रान्सप्लॅन्ट युनिटमध्ये हृदय प्रत्याराेपणासह फुप्फुस व यकृत प्रत्याराेपणाची प्रगत उपचार सेवा प्रदान करेल. एमजीएम हेल्थकेअरच्या माध्यमातून विवेका हाॅस्पिटलमध्ये हृदय प्रत्याराेपणासाठी अत्याधुनिक व सर्वाेत्तम सेवा प्रदान करण्यात येईल, असा विश्वास डाॅ. जगताप यांनी व्यक्त केला.
मिहानमध्ये वैद्यकीय उपकरणांची निर्मिती : गडकरी
हृदय, यकृत प्रत्याराेपणासाठी चेन्नईचा पर्याय हाेता. आता नागपुरात सुविधा झाल्याने माेठा दिलासा मिळेल, असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. वैद्यकीय सुविधांअभावी जवळच्या लाेकांना गमावणे वेदनादायी असते. काेराेनाकाळात आराेग्य सुविधांची गरज आपण अनुभवली आहे. जगातील प्रगत देशात १० पैकी ४ डाॅक्टर भारतीय असतात. भारताकडे बेस्ट ब्रेन आहे; पण संशाेधनाच्या सुविधा नाहीत. लंडन स्ट्रिटवर ४००० बेडचे रुग्णालय उभारल्यात येईल. शिवाय विशाखापट्टनमच्या धर्तीवर नागपूरच्या मिहान येथे वैद्यकीय उपकरणांच्या निर्मितीचे केंद्र (मेडिकल डिव्हाइस पार्क) उभारण्यात येणार असल्याचेही गडकरी यांनी यावेळी सांगितले.