रुग्णाशी बोलता-बोलता केले जाते हृदयाचे ‘व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2023 07:50 PM2023-02-10T19:50:43+5:302023-02-10T19:51:08+5:30
Nagpur News सध्या एकही टाका न लावता रुग्णाशी बोलता-बोलता हृदयाचे ‘व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट’ करता येत आहे, अशी माहिती प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. जसपाल अर्नेजा यांनी दिली.
नागपूर : ‘ओपन हार्ट सर्जरी’वर ‘ट्रान्सकॅथेटर’ प्रक्रियेने (टावर) हृदयाचे व्हॉल्व्ह रिप्लसेमेंट करण्याचा पर्याय उपलब्ध झाल्याने मागील पाच वर्षांत शेकडो रुग्णांना जीवनदान मिळाले. या उपचारपद्धतीत रोज नवीन बदल होत आहेत. सध्या एकही टाका न लावता रुग्णाशी बोलता-बोलता हृदयाचे ‘व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट’ करता येत आहे, अशी माहिती प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. जसपाल अर्नेजा यांनी दिली.
‘कार्डिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया’ व ‘असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया’ विदर्भ शाखेच्या वतीने ‘टावर’सारख्या महत्त्वाच्या विषयावर ‘लाइव्ह कॉन्फरन्स’चे आयोजन करण्यात आले आहे. याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अमर आमले व डॉ. विवेक मांडुरके उपस्थित होते.
९२ वर्षीय वृद्धावर ‘टावर’द्वारे हृदयाची बदलली झडप
डॉ. अर्नेजा म्हणाले, वयोवृद्ध रुग्णांमध्ये हृदयाची झडप म्हणजे ‘व्हॉल्व्ह’ बसविण्यासाठी ‘ओपन हार्ट सर्जरी’ करणे शक्य होत नाही. यावर ‘टावर’ ही प्रक्रिया पर्याय ठरली आहे. नुकतेच एका ९२ वर्षीय वृद्धावर ही प्रक्रिया करून त्यांना जीवनदान देण्यात आले.
- ॲन्जिओप्लास्टीमध्ये आता लेझरचा वापर
हृदयाचा धमन्यांतील ‘ब्लॉकेज’ दूर करण्यासाठी ‘बलून’चा वापर केला जातो; परंतु काही प्रकरणात ‘ब्लॉकेज’ कठोर असल्याने याचा वापर निष्फळ ठरतो. अशा प्रकरणात आता ‘लेझर’चा वापर करणे सुरू झाले आहे.
भारतात ११ वर्षे अगोदर ‘बायपास’
पाश्चात्त्य देशात हृदयावरील ‘बायपास सर्जरी’ साधारण ७३-७४ वयात होते; परंतु भारतात हे वय ११ वर्षांनी कमी झाले आहे. आपल्याकडे ६२-६३ या वयात ही सर्जरी करण्याची वेळ येत असल्याचे डॉ. अर्नेजा म्हणाले.
तरुणांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण वाढले
डॉ. आमले म्हणाले, अयोग्य जीवनशैली, व्यायामाचा अभाव, तणाव, अयोग्य आहार, लठ्ठपणा, तंबाखू व धूम्रपानाचे वाढते व्यसन, आदींमुळे तरुणांमध्ये हृदयविकार वाढत आहे. सध्या तरुण व वृद्धांमध्ये याचे प्रमाण ‘फिफ्टी-फिफ्टी’वर आले आहे.