चित्रकार सय्यद हैदर रझा यांना भावपूर्ण श्रद्धांजली
By Admin | Published: July 26, 2016 02:21 AM2016-07-26T02:21:32+5:302016-07-26T02:21:32+5:30
कला आणि कलावंतांसाठी समर्पित लोकमत भवनातील जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी येथे सोमवारी जगविख्यात चित्रकार सय्यद हैदर रझा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी येथे शोकसंवेदना अर्पण
नागपूर : कला आणि कलावंतांसाठी समर्पित लोकमत भवनातील जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी येथे सोमवारी जगविख्यात चित्रकार सय्यद हैदर रझा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
चित्रकार रझा यांचे दोन दिवसांपूर्वी निधन झाले. मध्य प्रदेशातील मंडला येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सोमवारी सायंकाळी या महान चित्रकाराला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीमध्ये मोठ्या संख्येने त्यांचे चाहते व कलाप्रेमी उपस्थित होते. यावेळी आर्ट गॅलरीमध्ये रझा यांच्या निवडक पेंटिंग्जचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. यासोबतच गेल्यावर्षी रझा यांनी लोकमतला दिलेल्या भेटीदरम्यानची छायाचित्रेही लावण्यात आली होती.
सुरुवातीला कलाप्रेमींनी चित्रकार रझा यांच्या छायाचित्रासमोर मेणबत्ती प्रज्वलित करून आपली आदरांजली अर्पण केली. यानंतर काही दिवसांपूर्वी रझा यांनी टीव्हीवर दिलेली मुलाखत प्रोजेक्टरच्या माध्यमातून दाखविण्यात आली.
या मुलाखतीमध्ये त्यांनी कलेच्यासंदर्भात सविस्तर चर्चा केली आहे.
यावेळी सेवानिवृत्त आयकर अधिकारी जी.जी.ए. नायडू, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील ललित कला विभागाचे माजी अधिष्ठाता विनोद इंदूरकर, चित्रकार सुधीर तलमले, छापखाना ग्रुपचे मिलिंद लिंबेकर, सदानंद चौधरी, अभिषित चौरसिया, महेश मानकर, आनंद डाबली, अमोल हिवरकर, आकाश सूर्यवंशी, विशाल सोरटे आणि कलाश्रय ग्रुपचे कलावंत उपस्थित होते. (प्रतिनिधी)
खुपच सज्जन व्यक्ती होते रझा साहेब
महान चित्रकार रझा यांच्या कधी ना कधी संपर्कात आलेल्या कलाप्रेमींनी यावेळी आपली आदरांजली अर्पण केली. त्यांच्यासोबत घालवलेल्या आठवणींना उजाळा दिला. सेवानिविृत्त आयकर अधिकारी जी.जी.ए. नायडू यापैकीच एक होते. त्यांनी सांगितले की, रझा साहेब खुपच सज्जन व्यक्ती होते. ते सर्वांशी सहजपणे बोलायचे.