नागपुरात सकाळी ऊन अन् दुपारी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या सरी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2023 02:05 PM2023-06-07T14:05:58+5:302023-06-07T14:10:46+5:30
अंगाची लाही लाही करणाऱ्या उन्हापासून नागरिकांना थोडा दिलासा
नागपूर : सकाळपासून सूर्याचे चटके अन् घामाच्या धारांनी त्रस्त झालेल्या नागपुरकरांना दुपारी वाऱ्यासह बसरलेल्या पावसाने आराम मिळाला. दुपारी वातावरणात बदल होऊन सोसाट्याचा वारा सुटला सोबत पावसाच्या सरींनी उन्हाची दाहकता कमी केली.
गेली काही दिवस विदर्भात ढगांचा खेळ चाललाय. २४ तासात पाऱ्याने उसळी घेत ४३ अंशाचा टप्पा पुन्हा गाठला. आज (दि. ७) सकाळपासूनच उन्हाच्या झळा जाणवत असताना दुपारी ढग दाटून आले व वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यामुळे अंगाची लाही लाही करणाऱ्या उन्हापासून नागरिकांना थोडा दिलासा मिळाला.
दरम्यान बदलणाऱ्या वातावरणीय घडामोडींमुळे मान्सून लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. पुढच्या दोन दिवसात अरबी समुद्रात अतितीव्र चक्रीवादळाची शक्यता निर्माण झाली आहे. केरळमध्ये ४ जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची अपेक्षा होती पण नव्या परिस्थितीमुळे मान्सून अंदमानात रेंगाळला आहे. त्यामुळे तो राज्यात आणि विदर्भातही काहीसा उशीरा दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र त्याचा पावसाच्या प्रमाणावर परिणाम होणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.