मान्सूनच्या प्रतिक्षेत उकाड्याचा त्रास; दमट वातावरणाने चिडचिड
By निशांत वानखेडे | Published: June 10, 2023 07:01 PM2023-06-10T19:01:09+5:302023-06-10T19:01:30+5:30
Nagpur News मान्सूनपूर्व आर्द्रतेत झालेली वाढ आणि त्यात सूर्याचा पारा चढलेलाच असताना किरणांना राेखणाऱ्या ढगांचा अडथळा नसल्याने मुंबईसारख्या दमट वातावरणाचा अनुभव सध्या विदर्भवासियांना येत आहे.
निशांत वानखेडे
नागपूर : मान्सूनपूर्व आर्द्रतेत झालेली वाढ आणि त्यात सूर्याचा पारा चढलेलाच असताना किरणांना राेखणाऱ्या ढगांचा अडथळा नसल्याने मुंबईसारख्या दमट वातावरणाचा अनुभव सध्या विदर्भवासियांना येत आहे. पारा सरासरीपेक्षा ३ ते ४ अंशाने वाढलेला असल्याने हाेणाऱ्या उकाड्याने नागरिकांची चिडचिड हाेत आहे.
सूर्यकिरणांच्या जमिनीवर ओतल्या जाणाऱ्या सध्याच्या उष्णतेमुळे दुपारच्या कमाल तापमानात कमालीची वाढ झाली आहे. जून महिन्यात सरासरी ३८ अंश कमाल तापमान असते. मात्र सध्या नागपूरसह विदर्भातील बहुतेक शहरांचे तापमान ४१ अंशाच्या वर आहे. नागपूरला शनिवारी ४२.७ अंश तापमानाची नाेंद झाली, जी सरासरीपेक्षा ३ अंशाने अधिक आहे. गाेंदियामध्ये सर्वाधिक ४३.४ अंशावर पारा गेला, जाे ४.२ अंशाने अधिक आहे. अमरावती, अकाेल्यात ४२ व ४२.८ अंशावरील कमाल तापमान ५.२ व ४.२ अंशाने अधिक आहे. चंद्रपूर ४२.६ अंश तर गडचिराेलीत ४२.२ अंशावर पारा आहे. रात्रीचे तापमानही सरासरीपेक्षा २ ते ३ अंशाने अधिक आहे.
सध्या घोषित झाली नसली तरी विदर्भात नकळत उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती आहे आणि हेच मुख्य कारण असुन १५ जून पर्यंत अशीच स्थिती असु शकते. विदर्भात मान्सूनचे आगमन व्हायला अजून १०-१२ दिवसाचा कालावधी आहे. साधारणत: २० ते २२ जूनपर्यंत पारा चढलेला व उकाडा वाढविणारा असताे. यंदा पारा चढलेला असला तरी २०२१ वगळता मागील १० वर्षात जूनमध्ये गेलेल्या तापमानापेक्षा ताे कमीच आहे. २०१४ साली ताे ४७.३ अंश, २०१५ मध्ये ४६.५ अंश, २०१९ साली ४७.२ अंश तर २०२२ साली सर्वाधिक ४६.२ अंश तापमानाची जूनमध्ये नाेंद झाली हाेती. यंदा उन्हाळ्याचे बहुतेक दिवस पावसात किंवा ढगाळ वातावरणात गेले असले तरी सर्वांना मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा लागलेली आहे.