नवतपाचा कहर, नागपूर @ ४६.५
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 10:01 AM2020-05-24T10:01:37+5:302020-05-24T10:02:01+5:30
दोन दिवसांपासून सुरू झालेला नवतपा नागपुरात चांगलाच कहर बरसायला लागला आहे. शनिवारी नागपूरचे तापमान ४६.५ अंश सेल्सिअस होते. या वर्षातील हा उच्चांकी तापमानाचा दिवस ठरला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दोन दिवसांपासून सुरू झालेला नवतपा नागपुरात चांगलाच कहर बरसायला लागला आहे. शनिवारी नागपूरचे तापमान ४६.५ अंश सेल्सिअस होते. या वर्षातील हा उच्चांकी तापमानाचा दिवस ठरला आहे. त्यापाठोपाठ अकोल्यातही ४६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा व अमरावती हे जिल्हेही चांगलेच तापत आहेत.
दोन दिवसापासून नवतपा सुरू झाला आहे. या काळामध्ये उष्णतामान प्रचंड वाढते. त्याचा अनुभव अगदी दुसऱ्याच दिवशी आला आहे. नागपुरातील तापमान गेल्या २४ तासात ०.९ अंश सेल्सिअसने वाढले. आज या तापमानाची नोंद ४६.५ करण्यात आली. तर अकोला शहरातदेखील ०.८ अंशाने तापमान वाढले. तेथे ४६ अंश तापमानाची नोंद झाली आहे. गेल्या तीन दिवसापासून नागपूर शहराच्या तापमानात प्रचंड वाढ होत आहे. याचा परिणाम शहराच्या जनजीवनावर पडला आहे. लॉकडाऊनच्या काळात रस्ते थोडेफार सुरू राहत असले, तरी गेल्या तीन दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे दुपारी रस्ते सुनसान होत आहेत. नागरिक आपली महत्त्वाची कामे सकाळच्या प्रहरात उरकताहेत किंवा सायंकाळी चारनंतर घराबाहेर पडण्याला प्राध्यान्य देत आहेत. पुढील आठवड्यातदेखील वातावरण चांगले तापणार असल्याचा इशारा वेधशाळेने वर्तविला आहे. विदर्भात नागपूर व अकोल्यासोबतच अमरावती, चंद्रपूर या दोन्ही ठिकाणी ४५.६ अंश तापमानाची नोंद झाली, तर वर्धा ४५.५ आणि गोंदियामध्ये ४५.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले आहे .
विदर्भात चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी आणि वाशिम या ठिकाणी कमी तापमानाची नोंद झाली. ब्रह्मपुरीमध्ये १.४ अंशाने तापमान वाढले असले तरी ४१.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले, तर वाशिम शहरांमध्ये ०.४ अंशाने तापमानात घट झाली असून ४२.६ अशी नोंद तिथे झाली आहे.