चटके वाढले! विदर्भात उष्णतेचा कहर, ब्रह्मपुरी-वर्धा ४५ पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2022 12:00 PM2022-04-28T12:00:32+5:302022-04-28T12:08:26+5:30
येत्या काही दिवसांत विदर्भात उष्णतेच्या लाटचा इशारा देण्यात आला आहे.
नागपूर : मागील आठवड्यापासून विदर्भासह उपराजधानी तापायला लागली असून, बुधवारचा दिवस ब्रह्मपुरी, नागपूर, अकोला व वर्ध्यासाठी परीक्षेचाच ठरला. ब्रह्मपुरीत सर्वात जास्त ४५.१ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले. वर्ध्यात परत एकदा ४५ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली; तर नागपुरात २४ तासात पारा १.८ अंश सेल्सिअसनी वाढला व ४४.८ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदविण्यात आले. विशेष म्हणजे या मोसमात प्रथमच नागपूरचा पारा ४४.५ अंशांपार गेला आहे. येत्या काही दिवसांत विदर्भातील चटके आणखी वाढण्याची शक्यता आहे.
बुधवारी विदर्भातील सर्वच ठिकाणी पारा वाढल्याचे दिसून आले. नागपूरसह अकोल्यातदेखील ४४.८ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. जवळपास प्रत्येकच ठिकाणी २४ तासांत ०.३ ते १.८ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची वाढ नोंदविण्यात आली. नागपुरात सकाळपासूनच उष्णता जाणवत होती. दुपारच्या सुमारास काही वेळ ढगाळलेले वातावरण होते, परंतु गरम वारेदेखील होते. सकाळी ८.३० वाजता आर्द्रता २३ टक्के होती व साडेपाच वाजता १३ टक्क्यांवर घट झाली.
हवामान खात्याने विदर्भात ‘यलो अलर्ट’ घोषित केला असून, पुढील चार ते पाच दिवस तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
जिल्हानिहाय कमाल तापमान
जिल्हा : तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
अकोला : ४४.८
बुलडाणा : ४१.८
ब्रह्मपुरी : ४५.१
चंद्रपूर : ४४.६
गडचिरोली : ४२.६
गोंदिया : ४३.८
नागपूर : ४४.८
वर्धा : ४५.०
वाशिम : ४३.६
यवतमाळ : ४४.२