नागपुरात मार्चमध्येच उष्माघाताचा जोर; २६ रुग्ण, २ मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2022 11:34 AM2022-04-05T11:34:57+5:302022-04-05T11:44:00+5:30
शहरात मार्चपासून ते आतापर्यंत २६ रुग्णांची नोंद झाली असून २ संशयित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या दोघांचा मृत्यू उष्माघातामुळे झाला असावा, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
नागपूर : यंदा मार्च महिन्यापासूनच उन्हाचे चटके बसू लागले. आता तर तापमानाचा पारा ४१ अंशांच्यावर गेला आहे. यामुळे उष्माघाताची लक्षणे असलेले रुग्ण दिसून येत आहेत. शहरात सोमवारी २ नवे रुग्ण आढळून आले. मार्चपासून ते आतापर्यंत २६ रुग्णांची नोंद झाली. २ संशयित रुग्णांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे.
एप्रिलअखेर व मे महिन्यातील तापमानाची तीव्रता यावर्षी मार्च महिन्यापासूनच जाणवायला लागली. याचा परिणाम आरोग्यावर होऊ लागला आहे. तीव्र उष्णतेच्या संपर्कात आल्यास शरीरातील तापमान नियंत्रित करणारी यंत्रणा कोलमडून पडते आणि उष्माघात होतो. चक्कर, डोकेदुखी, मळमळ-उलटी, पोटात वेदना, गोंधळलेली अवस्था ही उष्माघाताची लक्षणे आहेत. याकडे दुर्लक्ष केल्यास जिवाला धोका होतो. परंतु, या आजाराच्या रुग्णांच्या नोंदी ठेवणे, त्याची माहिती महापालिका, जिल्हा शल्यचिकित्सकापासून ते आरोग्य उपसंचालक आणि वैद्यकीय संचालकांना पाठविणे, रुग्ण दगावल्यास शवविच्छेदन करणे आदी प्रकार टाळण्यासाठी काही खासगी रुग्णालय उष्माघाताच्या रुग्णांना तापाचे रुग्ण म्हणून नोंद करतात. परिणामी, रुग्णांची संख्या कमी दिसून येत आहे. शहरात आतापर्यंत २६ रुग्णांची नोंद झाली आहे. असे असतानाही मनपासह मेयो, मेडिकलमधील ‘कोल्ड वॉर्ड’ची तयारी सुरूच आहे.
-ते मृतदेह अनोळखी व्यक्तीचे
मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांनी सांगितले, आज दोन अनोळखी मृतदेह आढळून आले. यातील एक कॉटन मार्केट परिसरात तर, दुसरा संविधान चौकात पडून होता. दोघांचे वय ४० ते ५० दरम्यान होते. या दोघांचा मृत्यू उष्माघातामुळे झाला असावा, अशी शंका आहे. यामुळे दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. त्याचा अहवाल आल्यावरच समिती त्यावर निर्णय घेईल.
पूर्व विदर्भात ३१ रुग्ण
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार पूर्व विदर्भातील सहाही जिल्हे मिळून २०१७ मध्ये उष्माघाताचे ४७९, तर २०१८ मध्ये ३२७ रुग्णांची नोंद झाली. विशेष म्हणजे, २०१७ मध्ये नागपूर जिल्ह्यात ३०६, तर २०१८ मध्ये ३०० रुग्ण आढळून आले होते. २०१९ ची आकडेवारी उपलब्ध होऊ शकली नाही. २०२० व २०२१ मध्ये कोरोनामुळे या आजाराच्या रुग्णांची नोंदच झाली नाही. यावर्षी मार्च महिन्यापासून नोंद घेण्यास सुरूवात झाली. त्यानुसार नागपुरात २६ तर चंद्रपूरमध्ये ५ असे एकूण ३१ रुग्ण आढळून आले आहेत.
लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्या
उन्हाशी संबंधित आजारांना दूर ठेवण्यासाठी उन्हात जाणे टाळा. उन्हात जाणे गरजेचे असल्यास सैल कपडे, संपूर्ण डोके झाकेल अशी टोपी किंवा छत्री, डोळ्यांसाठी गॉगल्सचा वापर करा. द्रव्य पदार्थांचे सेवन अधिक प्रमाणात करा. चांगल्या पद्धतीने ‘हाइड्रेटेड’ राहिल्याने शरीरातून घाम येणे आणि शरीराचे तापमान सामान्य ठेवण्यास मदत होते. उन्हात असलेल्या वाहनामध्ये कुणाला ठेवू नका. उन्हामध्ये बाहेर व्यायाम करू नका. लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
-डॉ. संजय जयस्वाल, उपसंचालक आरोग्य विभाग नागपूर
:: पूर्व विदभार्तील उष्माघाताची स्थिती
२०१७ : ४७९ रुग्ण : ०० मृत्यू
२०१८ : ३२७ : ०० मृत्यू
२०२२ : ३१ रुग्ण : ०२ मृत्यू (संशयित)