ऊन्हाचा तडाखा, विजेचा वापर वाढला अन् भरमसाठ वीज देयक आले; आपले देयक आपणच तपासा
By आनंद डेकाटे | Published: April 8, 2024 03:36 PM2024-04-08T15:36:37+5:302024-04-08T15:37:07+5:30
वीजवापराच्या प्रमाणात वीजबिल आल्याची खात्री करता येते.
आनंद डेकाटे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: काही दिवसांपासून नागपूरसह राज्यात सर्वत्र उन्हाचा कहर मोठ्या प्रमाणात वाढला आहे, त्यामुळे सहाजिकच पंखा, रेफ्रीजरेटर, एअर कंडिशनर यांचा वापरही दिवसेंदिवस वाढत आहे. या उपकरणांच्या वीजवापराच्या प्रमाणातच आपल्याला वीजबिल आले आहे की नाही ही शंका उपस्थित होते व याची चाचपणी केली जाते. यात विजेचा वापर कमी व आवश्यक असेल तेवढाच केल्यास वीजबिलात बचत होणे शक्य आहे तर वीजवापराच्या प्रमाणात वीजबिल आल्याची खात्रीही करता येते.
प्रत्येक घरी विद्युत उपकरणांची यादी वाढतच आहे व वाढतच जाणार आहे. त्यात रोज नवनवीन विद्युत उपकरणाची भर पडत आहे. मात्र ही उपकरणे वाढली व त्याचा वापर वाढला की, विजेचे बिलही वाढणार आहे. मात्र आपल्या हातात एप्रिल, मे, जून व जुलै महिन्याचे वीज देयक आले की, अनेकांच्या भुवया उंचावतात. माझा वापर एवढा नसताना बिल भरमसाठ आल्याचे त्यांना वाटत असते. एखाद्या प्रकरणात कर्मचाऱ्याच्या दोषामुळे, चुकीच्या मीटर वाचनामुळे किवा मीटरमधील तांत्रिक दोषामुळे हे होऊ शकते. त्यासाठी आपण आपल्या घरामध्ये, दुकान व इतर ठिकाणी असलेली विजेची उपकरणे त्याचा वॅट व त्याचा दैनंदिन वापर याची जर माहिती करून घेतली व अभ्यास केला तर आपल्यालाही सत्यता पडताळता येईल.
त्यासाठी वीज देयक जाणून घेण्यासाठी अनेक संकेतस्थळे व अॅप आहेत त्यावर जाऊन आपण आपल्या घरात असणारी उपकरणे, त्याचा असलेला वॅट व संख्या, आणि उपकरणाचा दिवसातील वापराचे तास ही माहिती टाकल्यास आपला महिन्याला होणारा एकूण युनिट वापर व वीजबिलाची अंदाजित रक्कम याची माहिती आपण प्राप्त करू शकता. १००० वॅटचे उपकरणाचा जर एक तास वापर केला तर १ युनिट साधारणतः वीज खर्च होते.
- वीज वापराबाबतचा तक्ता
प्रकार : वीज वापर (वॅट्स) एक युनिट विजेसाठी लागणारा वेळ
- पंखा : ३६ इंच - ६० - १६ तास ४० मिनीट
- पंखा : ४२ इंची ८० - १२ तास ३० मिनीट
- टेबल फॅन : ४० - २५ तास
- मिक्सर, ज्युसर - २ तास १३ मिनीट
- इलेक्ट्रीक ओव्हन - ५० मिनीट
- इस्त्री – कमी वजन - ६० मिनीट
- इस्त्री जास्त वजन - ३० मिनिट
- टीव्ही १५ - तास ४० मिनिट
- वॉशिंग मशीन स्वयंचलित - ३० मिनीट
- सेमी स्वयंचलित - २ तास ३० मिनीट
- व्हॅक्यूम क्लिनर - १ तास
- संगणक - ४ तास
- वॉटर प्युरिफायर - ४० दिवस